सोलापूर काँग्रेसच्या 'सर्जिकल स्ट्राईक'ची वेळ 

Sushilkumar Shinde
Sushilkumar Shinde

सोलापूर : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला असला तरी, राष्ट्रवादीचे प्रभुत्व असलेल्या मोहोळ या भागातून त्यांना मताधिक्‍क्‍य मिळाले आहे. त्यामुळे एकूणच काँग्रेसचे जिल्ह्यातीलच अस्तित्व धोक्‍यात आले आहे. हीच स्थिती कायम राहिली तर भविष्यात काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या मतदारसंघात भगव्याचे महत्त्व वाढण्याचे संकेत आहेत. त्यामुळे काँग्रेसचे प्राबल्य वाढविण्यासाठी जिल्ह्यात काँग्रेसच्या "सर्जिकल स्ट्राईक'ची गरज आहे. 

सोलापूर लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी शहर उत्तर, शहर मध्य आणि दक्षिण सोलापूरमधील निम्मा भाग आहे. या तिन्ही मतदारसंघांतून श्री. शिंदे यांना मोठे मताधिक्‍क्‍य मिळणे अपेक्षित होते. मात्र, या तिन्ही मतदारसंघांसह काँग्रेसचे आमदार असलेल्या अक्कलकोट मतदारसंघातूनही श्री. शिंदे यांना पिछाडीवर जावे लागले आहे. या उलट माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वाखालील मोहोळ मतदारसंघात त्यांना मताधिक्‍क्‍य मिळाले आहे. या निवडणुकीत दोन्ही काँग्रेसची आघाडी नसती तर ही मतेही श्री. शिंदे यांना मिळाली नसती हेही तितकेच खरे आहे. 

जिल्ह्यात काँग्रेस पिछाडीवर जाण्यास सर्वांत मोठे कारण आहे ते लोकसंपर्काचे. केवळ निवडणुका आल्या की लोकांशी संपर्क ठेवायचा आणि इतर वेळी गप्प राहायचे. वास्तविक पाहता शेतकऱ्यांचे प्रश्‍न, बेरोजगारी, धनगर आरक्षण, मंगळवेढ्यातील 35 गावांचा पाणीप्रश्‍न या सारख्या महत्त्वाच्या प्रश्‍नांवर सरकारला धारेवर धरणे शक्‍य होते. आंदोलने करण्यात आली मात्र ती तितकीशी प्रभावी ठरली नाहीत. त्यामुळे नागरिकांनीही ही आंदोलने गांभीर्याने घेतली नाहीत. त्यामुळे ही आंदोलने कार्यकर्त्यांपुरतीच मर्यादित राहिली. शहरात करण्यात आलेल्या आंदोलनांचेही स्वरूप असेच राहिले. शहरवासीयांना होणारा अपुरा पाणीपुरवठा, शहरातील मूलभूत सुविधांची वानवा या संदर्भात अपेक्षेप्रमाणे आंदोलने झाली नाहीत. काँग्रेसच्या आमदार असणाऱ्या शहर मध्य या मतदारसंघातूनही शिंदेंना पिछाडीवर जावे लागले यातच शहर काँग्रेसच्या अपयशाचे गमक आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मतदारसंघ सोडला तर माढा मतदारसंघातील करमाळा, माढा, सांगोला, माळशिरस या मतदारसंघातही काँग्रेसची स्थिती नगण्यच आहे. 

बालेकिल्ले गेले इतर पक्षाच्या ताब्यात 
सोलापूर जिल्ह्यातील शहर उत्तर, शहर मध्य, अक्कलकोट हे काँग्रेसचे बालेकिल्ले म्हणून ओळखले जातात. मात्र, लोकसभा निवडणुकीत या तिन्ही बालेकिल्ल्यांत भाजपने यावर्षीही निर्णायक आघाडी घेतली आहे. त्यामुळे काँग्रेसचे हे तिन्ही बालेकिल्ले ढासळण्याच्या स्थितीत असून, त्याचा विधानसभा निवडणुकीच्या वेळी फटका बसण्याची शक्‍यता आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com