निसर्ग साखळीत महत्त्व असल्यानेच गाढव संवर्धनावर भर

निसर्ग साखळीत महत्त्व असल्यानेच गाढव संवर्धनावर भर

कोल्हापूर - राज्यात २०१४ च्या पशुगणनेनुसार गाढवांची संख्या २९ हजार आहे. तुलनेत ही संख्या कमी आहे. गाढव समाजात हेटाळणीचे जनावर असले, तरीही निसर्ग साखळीत त्याचे स्थान महत्त्वाचे असल्याने आम्ही गाढव संवर्धनावर विशेष फोकस केला असल्याचे राज्याचे पशुसंवर्धन अतिरिक्त आयुक्‍त डॉ. डी. डी. परकाळे यांनी सांगितले. 

डॉ. परकाळे म्हणाले, ‘‘गाढवांची तस्करी सुरू असल्याची चर्चा आहे. तस्करीचा थेट प्रकार अद्याप उघड नाही; पण आम्ही ‘गाढवावर लक्ष ठेवा’ अशा सूचना जिल्हा पातळीवर दिल्या आहेत आणि असे लक्ष ठेवल्यामुळेच काल इंदापुरात १५ गाढवांची चोरी करून त्यांना आंध्र प्रदेशात घेऊन जाणारा टेंपो पकडला गेला आहे.’’

डॉ. परकाळे म्हणाले, ‘‘रस्त्यावरचा कचरा किंवा घाण पदार्थ गाढव खाते. त्याची ही सवय म्हणजे एक प्रकारे निसर्ग साखळीचाच एक घटक आहे. कारण त्यांच्यामुळे कचरा काही प्रमाणात कमी होतो. अर्थात त्यामुळे कचरा कमी होण्यात फार मोठा फरक पडत नाही, हेदेखील खरे आहे, पण कचरा खाण्याची त्याची सवय स्वच्छतेसाठी पूरक आहे. याशिवाय कष्टाची कामे व आज्ञाधारकता हे गाढवाचे गुण आहेत. वडर आणि कुंभार समाजाला गाढवांचा मोठा आधार आहे. २०१४ च्या पशुगणनेत वाडीवस्तीवर जाऊन गाढवाची माहिती घेण्यात आली. त्याची नोंद केली. त्यामुळे राज्यात २९ हजार गाढव असल्याची माहिती गोळा झाली; मात्र ही संख्या तुलनेत कमी आहे. ही संख्या वाढवण्यासाठी त्यांचे संवर्धन महत्त्वाचे आहे.’’

डॉ. परकाळे म्हणाले, ‘‘गाढवांची चीनला तस्करी होते असे सांगितले जाते. त्याचे मांस, कातडी, विकली जाते असेही सांगितले जाते. आमच्या नजरेस कोठे गाढवांचे मांस विकले जात असल्याचे आले नाही; पण शक्‍यता नाकारताही येत नाही. गेल्याच वर्षी केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागाने या संदर्भात काही मार्गदर्शनपर सूचना केल्या होत्या. या वर्षीही गाढवांच्या नोंदीचे काम सुरू झाले आहे. ज्या ठिकाणी पारंपरिक कष्टाच्या कामासाठी गाढवांचा वापर होतो त्या संबंधिताकडे जाऊन गाढवांच्या नोंदी करण्याचे काम सुरू आहे. ही नोंदणी अचूक होईल याची सर्वतोपरी खबरदारी घेण्यात आली आहे.’’

गाढव खूप आज्ञाधारक प्राणी आहे; पण त्याला प्रत्येकजण हुसकतो. आम्हाला आमच्या कष्टाच्या कामात तो मोठा आधार आहे. पगारी नोकरापेक्षा गाढव आज्ञाधारक आहे. त्याच्या देखभालीचा फारसा खर्च नाही; पण आता गाढवांची चोरी होत आहे. त्याचे स्मगलिंग होत आहे असेही कानावर आले आहे. त्यामुळे आम्ही गाढवांची विशेष काळजी घेत आहोत.
- कृष्णात पोवार,
वीटभट्टी चालक व गाढव पालन करणारे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com