नेहरू युवा मंडळांना उतरती कळा!

अशोक मुरुमकर
गुरुवार, 21 जून 2018

सोलापूर - युवकांना प्रोत्साहन मिळावे म्हणून गावागावांमध्ये केंद्र सरकारच्या युवा व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने नेहरू युवा मंडळे सुरू केली. परंतु, या मंडळांना सध्या उतरती कळा लागली आहे. काही वर्षांपासून निधी तर बंद झालाच, पण यंदा तर सरकारकडून तालुक्‍यातील समन्वयकांच्या नेमणुकासुद्धा अद्याप झाल्या नाहीत. मे महिन्यात या नेमणुका होणे अपेक्षित होते, परंतु अद्याप त्याला मुहूर्त मिळालेला नाही.

नेहरू युवा केंद्राच्या वतीने ग्रामीण भागात "बेटी बचाओ, बेटी पढाओ', "स्वच्छता अभियान', "कॅशलेस व्यवहार', "योगा', "जलयुक्त शिवार', "हागणदारीमुक्त गाव' आदींची जनजागृती केली जाते. युवकांना सामाजिक कामात प्रोत्साहन मिळावे म्हणून मंडळ सुरू करण्यासाठी सुरवातीला अनुदान दिले जात होते. परंतु, आता ते अनुदान बंद झाले आहे. त्यामुळे नवीन मंडळ सुरू करण्यासाठी युवक पुढे येत नाहीत. जी मंडळे सुरू आहेत, त्यांना सध्या निधीअभावी कार्यक्रम दिले जात नाहीत. 2017-18 मध्ये "स्वच्छ गाव अभियान' राबविले; परंतु त्याचेही अद्याप अनेक ठिकाणी पुरस्कार दिले नाहीत.

सर्व मंडळांच्या कार्यकर्त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी येणे शक्‍य होत नाही. म्हणून राज्यातील प्रत्येक तालुक्‍यात "तालुका समन्वयक' नेमला जातो. त्यातून त्यांना रोजगार मिळत होता, तसेच सरकारकडून मानधन दिले जाते. मार्च-एप्रिलमध्ये यासाठी जाहिरातीद्वारे अर्ज मागितले होते. त्यानंतर अर्ज कमी आल्याचे कारण देत अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली होती. त्यानंतर मेमध्ये निवडी होतील, अशी शक्‍यता होती. जूनमध्ये या निवडीची प्रक्रिया जिल्हा नेहरू युवा केंद्रांनी सुरू केली होती. परंतु पुन्हा त्याला स्थगिती दिल्याचे सूत्राकडून सांगण्यात येत आहे.

नेहरू युवा केंद्रे - 623
युवक व युवती मंडळे - 2,73,000
देशातील कार्यालये - 29
देशातील स्वयंसेवक - 12,000

Web Title: nehru yuva mandal