धक्कादायक - काकूने पुतण्याला उशीखाली दाबून मारले 

0crime_201_74.jpg
0crime_201_74.jpg

कडेगाव : वडियेरायबाग (ता. कडेगाव) येथून बेपत्ता असलेल्या राजवर्धन परशुराम पवार या चार वर्षाच्या बालकाचे अपहरण करुन त्याचा चुलत चुलती शुभांगी प्रदीप जाधव (वय 27, वडियेरायबाग) हिने स्वतःच्या राहत्या घरी तोंडावर उशी दाबून निर्घृण जीवे मारल्याचे उघड झाले. 
राजवर्धनचे आजोबा व त्याच्या वडिलांनी घरातून पैसे चोरीला गेल्याचा संशय शुभांगी व इतरांवर घेतला होता. त्याचा राग धरून शुभांगीने हे निर्घृण कृत्य केल्याचे पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. 

चिंचणी-वांगी पोलिसांनी संशयित शुभांगी हिच्यासह तिचा मावसभाऊ शंकर वसंत नंदीवाले (वय 26, तडसर, ता. कडेगाव) दोघांना अटक केली आहे. ही घटना वडियेरायबाग येथे 21 जानेवारी रोजी सकाळी साडे अकरा वाजता संशयित शुभांगीच्या घरी घडली. 

चिंचणी-वांगी पोलिसांनी माहिती दिली, की वडियेरायबाग येथील मृत राजवर्धनचे आजोबा बापू पवार यांनी स्वतःच्या मालकीची जागा विकली होती. त्याचे अडीच लाख रुपये आले होते. ते त्यांनी घरी ठेवले होते. त्याची तीन जानेवारी रोजी घरातून चोरी झाली. 

दरम्यान, बापू पवार व त्यांचा मुलगा फिर्यादी परशुराम पवार यांनी चोरीचा संशय घरातील शुभांगीसह आसपासच्या शेजाऱ्यांवर घेतला. खरे-खोटे करण्यासाठी सर्वांना घेऊन विशाळगड येथे देवदर्शनाला निघाले होते. वाटेत त्यांना घरांतील नातेवाईकांचा दूरध्वनी आला, की चोरीच्या रक्कमेपैकी दीड लाख रुपये घरासमोरील अंगणात गोठ्यातील वैरणीखाली सापडले आहे. त्यानंतर ते सर्वजण घरी आले. त्यानंतर उर्वरित एक लाखाची रक्कम संशयित व अन्य कोणी चोरली ? अशी कुजबुज पुन्हा बापू पवार यांनी सुरू केली. पुन्हा संशयीतेवर आणि इतरांवर संशय घेण्यास सुरूवात केली. त्याचा राग शुभांगीने मनात धरला होता. 

तर 21 जानेवारी रोजी परशुराम पवार यांचा चार वर्षाचा मुलगा राजवर्धन पवार हा अंगणवाडी शाळेत सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास निघाला असता चुलत चुलती शुभांगी हिने स्वतःच्या घरी आणले व घरातच राजवर्धनच्या तोंडावर जोराने उशी दाबून धरुन त्याचा खून केला. 
राजवर्धनचा खून केल्यानंतर संशयित शुभांगीने तिचा मावसभाऊ शंकर नंदीवाले यास तडसर येथून बोलावून घेऊन मुलाचे प्रेत प्रवाशी बॅगेत भरून दिले. ते शंकर याने हिंगणगाव खुर्द (ता.कडेगाव) येथील देसकट वस्तीजवळ वारूसळा ओढ्याच्या पात्रात बंधाऱ्याजवळ टाकून दिले. पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. 

तर राजवर्धनचे प्रेत ज्या ठिकाणी टाकण्यात आले होते. त्याठिकाणी भटकी कुत्री व अन्य वन्य प्राण्यांनी त्याच्या शरीराचे लचके तोडले होते. याठिकाणी पोलिसांनी तपास केला असता तेथे त्याची कवटी व हाडांचा सांगाडा, शाळेचे दफ्तर व कपडे आढळून आले. 

दरम्यान, अंगणवाडीत गेलेला राजवर्धन शाळा सुटली तरी घरी आला नाही. त्यामुळे राजवर्धनचे वडील परशुराम, आजोबा बापू पवार यांच्यासह घरांतील नातेवाईकांनी राजवर्धनचा सर्वत्र शोध घेतला. परंतु तो मिळून आला नाही. त्यामुळे वडील परशुराम यांनी कोणीतरी अज्ञात इसमामाने राजवर्धनला पळवून नेल्याची फिर्याद चिंचणी-वांगी पोलीस ठाण्यात दिली होती. 
दरम्यान, चिंचणी-वांगी पोलिसांनी फिर्यादीचा कसून तपास केला असता या खून प्रकरणाचे रहस्य उलगडण्यात त्यांना यश आले. 

पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा, अप्पर पोलिस अधिक्षक मनिषा दुबुले, उपविभागीय पोलीस अधिकारी अंकुश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचणी-वांगीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी यांच्यासह पोपट पवार, अधिक वनवे, उदय देशमुख, अमर जंगम, आनंदा पवार, विशाल साळुंखे यांच्या पथकाने तपास केला. पोलिसांनी संशयितांच्या मुसक्‍या आज आवळल्या. खून प्रकरणी अटक केलेले संशयित शुभांगी जाधव व शंकर नंदिवाले यांना आज कडेगाव येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना शनिवारी (ता. 15) पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. 

""घरात ठेवलेल्या अडीच लाखांच्या चोरीचा संशय राजवर्धनची चुलत काकू शुभांगी जाधववर त्याचे आजोबा बापू व वडील परशुराम पवार यांना होता. त्या रागातून चुलती शुभांगी हिने स्वतःच्या राहत्या घरातच राजवर्धनच्या तोंडावर उशी दाबून त्याचा खून केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. अजूनही अधिक तपास सुरु आहे.'' 

-संतोष गोसावी, 
सहायक पोलीस निरीक्षक, चिंचणी-वांगी. 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com