प्रवाशांनो व्यवहार करा कॅशलेस ; ॲप आले मदतीला

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 22 September 2020

एक ऑक्‍टोबरपासून ही कॅशलेस कार्ड सेवा सुरू करण्याचे परिवहनचे नियोजन आहे.

बेळगाव : प्रवाशांना लवकरच परिवहन मंडळाची कॅशलेस सुविधा प्राप्त होणार आहे. खासगी संस्थेच्या सहकार्याने वायव्य परिवहन महामंडळाने ‘चलो ॲप’ विकसित केले आहे. प्रायोगिक तत्त्वावर कर्नाटकात प्रथमच बेळगावची यासाठी निवड केली असून ‘चलो ॲप’चा वापर बेळगावातून केला जाणार आहे. ही योजना यशस्वी झाल्यास वायव्य परिवहनच्या सर्व बसमध्ये त्याचा वापर होणार आहे. एक ऑक्‍टोबरपासून ही कॅशलेस कार्ड सेवा सुरू करण्याचे परिवहनचे नियोजन आहे.

हेही वाचा - कोकणात शेतकरी उदासीन ; यंदा विमा संरक्षित क्षेत्रामध्ये घट 

स्मार्ट सिटीअंतर्गत परिवहनच्या सर्व शहर बसमध्ये जीपीएस प्रणाली बसविली जात आहे. याचा वापरही या ‘चलो ॲप’साठी केला जाणार आहे. परिवहनच्या या ॲपचा वापर करण्यास इच्छुक असलेल्या प्रवाशांना एक स्मार्ट कार्ड दिले जाईल. मोबाईलच्या ई-रिचार्जप्रमाणेच या कार्डचेही रिचार्ज 
करावे लागेल. कार्डधारक बसथांब्यावर आल्यानंतर त्याला कोणती बस स्थानकावर येणार आहे, याची स्मार्ट बसथांब्यावरील स्क्रीनवरुन आगाऊ माहिती मिळेल. त्यानुसार बसमध्ये चढण्यापूर्वीच प्रवासी या कार्डद्वारे मोबाईलवरील ॲपच्या साहाय्याने शहर बससेवेचे आगाऊ तिकीट बुकिंग करेल. त्यामुळे प्रवाशाला वाहकाकडे पैसे देऊन तिकीट घेण्याची गरज भासणार नसून केवळ ॲपवरील माहिती दाखवावी लागणार आहे.

एखाद्या वेळेस कार्डधारकाने ॲपवर ऑनलाईन तिकीट जरी बुक केले नसेल, तरी वाहकाला पैसे देण्याची गरज भासणार नाही. केवळ आपले कार्ड वाहकाकडे दिल्यास ते स्वाईप करुन वाहक प्रवाशाला कार्ड परत करेल. यामुळे तिकीटाचे पैसे कार्डमधून ऑनलाईन कपात केले जातील. यामुळे चिल्लर पैशांसाठी वाहक आणि प्रवाशांमध्ये नेहमीच होणारे वादावादीचे प्रसंगही कमी होणार आहेत. पहिल्या टप्प्यात शहरातील ४८ बसमध्ये ही सेवा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. प्रायोगिक टप्प्यात योजना असल्याने सध्या केवळ शहर बससेवेत त्याचा वापर होईल. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास वायव्य परिवहन मंडळाकडून हुबळीसह इतर ठिकाणीही शहर सेवेत त्याचा विस्तार केला जाणार आहे. 

हेही वाचा - मंडणगडच्या  कलाकारांनी  बिंबवले कोरोनाचे  गांभीर्य  

" ‘चलो ॲप’ सेवेचा प्रयोग करण्यासाठी परिवहन मंडळाने बेळगावची निवड केली आहे. कर्नाटकात हा पहिलाच प्रयोग ठरला आहे. यामुळे प्रवाशांना कॅशलेस सुविधा उपलब्ध होणार आहे. नेहमी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हे ॲप सोयीस्कर ठरणार आहे. प्राथमिक टप्प्यात केवळ बेळगाव शहर सेवेसाठी त्याचा वापर केला जाईल. नंतर तो यशस्वी ठरल्यास परिवहन मंडळाकडून त्याच्या विस्ताराबाबत निर्णय घेतला जाईल."

- महादेव मुंजी, नियंत्रक, परिवहन मंडळ बेळगाव विभाग

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: with the new app chalo app used by a parivahan mandal for travellers in belgaum