कलेढोण बस स्थानकाला मिळणार झळाळी! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 मे 2018

कलेढोण - दुरवस्था झालेल्या येथील बस स्थानकाला आता झळाळी मिळणार आहे. माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी बस स्थानकासाठी चार लाख 46 हजारांचा निधी उपलब्ध करून घेतल्याने कलेढोण भागातील प्रवासी, वाहनचालक, ग्रामस्थ समाधान व्यक्त करत आहेत. 

खटावच्या पूर्व भागात कलेढोण ही महत्त्वाची बाजारपेठ आहे. परिसरातील 11 गावांतील व वाड्या- वस्त्यांवरील लोक येथे व्यापारानिमित्त दाखल होतात. मात्र, येथील बस स्थानकात कोणीही फिरकत नाही. कित्येकदा ते प्रवाशांविना उजाड पडलेले असते. कारण बस स्थानकामध्ये फक्त धुराळाच उडत असतो. बस स्थानकातील फरशा, कठडे तुटले आहेत. सिमेंटचे बाक मोडून पडले आहे. परिसरात डांबर पाहावयास मिळत नाही. अशा दुरवस्थेत असलेल्या बस स्थानकाकडे परिवहन महामंडळाचेही दुर्लक्ष झाले होते. मात्र, आता माजी आमदार डॉ. येळगावकर यांच्या प्रयत्नामुळे परिवहन बांधकाम विभाग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या सहकार्याने विशेष बाब म्हणून कलेढोण बस स्थानकासाठी चार लाख 46 हजार निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे कलेढोणच्या बस स्थानकाला झळाळी येणार असल्यामुळे प्रवासी समाधान व्यक्त करीत आहेत. 

""अनेक वर्षांपासून बस स्थानकाची दुरवस्था झाली होती. ती दुरुस्तीनंतर दूर होऊन कलेढोणच्या वैभवात भर पडणार आहे. त्यामुळे व्यापारी, प्रवासी, वाहनचालकांत समाधान व्यक्त होत आहे.'' 
-सयाजी दबडे, व्यापारी 

Web Title: new look kaledhon bus stop