नियोजित टोल नाक्याची जागा बदलासाठी मरवडे येथे रास्तारोको 

श्रीकांत मेलगे 
शनिवार, 13 एप्रिल 2019

मरवडे (सोलापुर) - टेंभुर्णी-पंढरपूर-विजयपूर या महामार्गावर मरवडे (ता. मंगळवेढा) येथे जुन्या टोलनाक्याच्या ठिकाणी नव्याने मोठ्या स्वरूपात टोलनाका उभा करण्यात येणार असल्याने या नियोजित टोल नाक्याची जागा बदलण्यात यावी या मागणीसाठी मरवडे येथे टोल हटाव कृती समिती व ग्रामस्थांच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी लोकसभा निवडणूकीवर घालण्यात आलेल्या बहिष्कार मागे घेण्यात आला.

मरवडे (सोलापुर) - टेंभुर्णी-पंढरपूर-विजयपूर या महामार्गावर मरवडे (ता. मंगळवेढा) येथे जुन्या टोलनाक्याच्या ठिकाणी नव्याने मोठ्या स्वरूपात टोलनाका उभा करण्यात येणार असल्याने या नियोजित टोल नाक्याची जागा बदलण्यात यावी या मागणीसाठी मरवडे येथे टोल हटाव कृती समिती व ग्रामस्थांच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी लोकसभा निवडणूकीवर घालण्यात आलेल्या बहिष्कार मागे घेण्यात आला.

मरवडे येथे जुन्या टोलनाक्याच्या ठिकाणीच नवा टोलनाका उभा करण्यासाठी हालचाली सुरू झाल्यानंतर या नव्या टोलनाक्याचे काम बंद करीत टोलनाक्याची जागा बदलण्याची मागणी जिल्हाधिकारी यांचेकडे करण्यात आली होती. या मागणीची दखल घेतली जात नसल्याने मरवडेत आज सकाळी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. तीर्थक्षेत्र असलेले मरवडे हे गाव पस्तीस गावांची बाजारपेठ आहे त्यामुळे भावीक व नागरिकांची याठिकाणी नेहमीच वर्दळ असते. नियोजित टोलनाका गावाच्या जवळच प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा परिषद शाळा व  वस्ती परिसरात गावठाणातच येतो. गावठाणात टोलनाका झाल्यास नागरिकांच्या दृष्टीने अडचणीचे ठरणार असून अपघाताच्या प्रमाणातही वाढ होणार आहे. मरवडे गावापासून दोन किलोमीटर अंतरावर करण्यात यावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे. सकाळी साडेनऊ वाजता सुरू करण्यात आलेले रास्तारोको आंदोलन मंडलाधिकारी राजू बनसोडे, तलाठी मधुकर वाघमोडे, पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय पुजारी यांना निवेदन देण्यात आल्यानंतर स्थगित करण्यात आले. येत्या पंधरा दिवसात शासनस्तरावर निर्णय घेतला जाईल असे सांगितले गेल्या नंतर लोकसभा निवडणुकीवर टाकण्यात आलेला बहिष्कारही मागे घेण्यात आला आहे. सुमारे दोन तास आंदोलन चालल्यामुळे रस्त्यावर दोन्ही बाजूस मोठ्या प्रमाणात वाहतूक व्यवस्था खोळंबली होती.

या आंदोलनात टोल हटाव कृती समितीचे रजाक मुजावर, छत्रपती परिवाराचे संस्थापक सुरेश पवार, दामाजी शुगरचे माजी संचालक नामदेव गायकवाड, सरपंचपती महादेव मासाळ, उपसरपंच विजय पवार, सोमनाथ टोमके,ग्रामपंचायत सदस्य दत्ता मासाळ, प्रा.संतोष पवार, हैदर केंगार, माजी उपसरपंच अल्लाबक्ष इनामदार,सतीश शिंदे,नवनाथ जाधव, हरी जाधव यांच्यासह मरवडे ग्रामस्थ मोठया संख्येने सहभागी झाले होते.

शासनाकडून टोलनाक्याची जागा बदलण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे. येत्या पंधरा दिवसात टोल नाक्याच्या जागेत बदल करण्यात आला नाही तर टेंभुर्णी-पंढरपूर-विजयपूर या महामार्गाचे कामच बंद पाडण्यात येईल.
- रजाक मुजावर, माजी उपसरपंच, मरवडे

Web Title: for new toll naka rasta roko at maravde solapur