कोरोनानंतरच्या उपचारासाठी बेळगावात पोस्ट कोविड केंद्राचा नवा ट्रेंड

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 19 September 2020

महाराष्ट्र व कर्नाटकात प्रमुख शहरांमध्ये पोस्ट कोविड उपचार केंद्रांची सुरवात झाली.

बेळगाव : कोरोना उपचारांसाठी शासकीय व खासगी कोरोना उपचार केंद्रांची संख्या वाढल्यानंतर पोस्ट कोविड उपचार केंद्रांना मागणी वाढली आहे. महाराष्ट्र व कर्नाटकात प्रमुख शहरांमध्ये पोस्ट कोविड उपचार केंद्रांची सुरवात झाली. बेळगावात केएलई रुग्णालयात आज पोस्ट कोविड उपचार केंद्राची सुरवात झाली आहे. अन्य काही खासगी रुग्णालयांनी या केंद्रासाठी आरोग्य विभागाकडे पाठपुरावा चालविला आहे.

कोरोना उपचारानंतर बरे होऊन घरी गेल्यानंतर रुग्णांना पुढील काही दिवस आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागते. कोरोनामुळे फुफ्फुसाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत असल्यामुळे न्यूमोनिया किंवा अन्य विकार होऊ नयेत, याची खबरदारी घ्यावी लागते. त्यासाठी नियमित वैद्यकीय उपचार व डॉक्‍टरांच्या सल्ल्याची गरज असल्यामुळे पोस्ट कोविड किंवा कोरोना नंतरच्या उपचारासाठी नव्या केंद्रांची सुरुवात होत आहे. बेळगावातही हा नवा ट्रेंड सुरु होत आहे. रुग्णांची संख्या वाढल्यानंतर खासगी रुग्णालयांना उपचारासाठी परवानगी दिली. परंतु, तेथील ५० टक्के बेड कोरोनाबाधितांसाठी राखीव ठेवण्याची अट घातली.

हेही वाचा - अकरा वर्षे उपेक्षित राहिलेल्या वीरमातेच्या न्यायाचा मार्ग खुला 

 

शासकीय कोविड केंद्रातून उपचारासाठी दाखल झालेले व थेट दाखल झालेल्या बाधितांसाठी वेगवेगळे उपचार दर निश्‍चित झाले. तीन आठवड्यांपासून कोरोनाची लक्षणे नसलेल्यांसाठी खासगी कोरोनो उपचार केंद्रे सुरु केले आहेत. प्रत्येक दिवसासाठी उपचाराचा दर निश्‍चित करून तेथे बाधितांना दाखल करून घेतले जात आहे. आरोग्य विभागाकडून रितसर परवानगी घेऊनच या केंद्रांचे कामकाज सुरु झाले आहे.

शहरातील काही हॉटेल्स, वसतिगृहातही या खासगी उपचार केंद्रांचे कामकाज सुरु आहे. कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. मृत्यूदरही कमी झाला आहे. अर्थात विविध संस्थांनी ऑक्‍सिजन सिलिंडर पुरवठ्यासाठी घेतलेला पुढाकार, विविध संस्थांकडून उपलब्ध करून देण्यात आलेले व्हेंटिलेटर यामुळे हा सकारात्मक परिणाम झाला आहे. मात्र बरे होऊन गेलेल्यांना आरोग्याच्या समस्या उद्‌भवू नयेत, यासाठी पोस्ट कोविड केअर ही संकल्पना पुढे आली आहे. 

हेही वाचा - भय कोरोनाचे ;  शाळा बंद मात्र कलाशिक्षकाचे समुपदेशनाचे काम सुरुच

 

केंद्रांना महत्त्व येणार

कोरोनामुळे संबंधितांवर नकारात्मक परिणाम होतो. नैराश्‍यही येऊ शकते. त्यातून बाहेर पडण्यासाठी मदत करणे, याशिवाय रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार असेल तर कशी काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन करणे असे कार्य हे केंद्र करणार आहे. केंद्रीय आरोग्य विभागानेही यासंदर्भात नियमावली तयार केली. त्या नियमावलीचे पालन करून या सेंटर्सचे कामकाज चालवावे लागणार आहे. कोरोना होऊन गेल्यावर पुन्हा होत नाही, असे आरोग्य विभागाकडून सांगितले जाते, पण काही जणांना पुन्हा बाधा झाली. त्यामुळे पोस्ट कोविड उपचार केंद्रांना महत्त्व येणार आहे.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new trend in maharashtra and karnataka post covid centers are avialble in belgum