esakal | 'DEJA VU' अर्थ काय रे भाऊ? अनोख्या शब्दाची सांगलीत उकल
sakal

बोलून बातमी शोधा

'DEJA VU' अर्थ काय रे भाऊ? अनोख्या शब्दाची सांगलीत उकल

'DEJA VU' अर्थ काय रे भाऊ? अनोख्या शब्दाची सांगलीत उकल

sakal_logo
By
अजित झळके

सांगली : सांगलीत काही ठिकाणी फलक लागलेत, त्यावर एका युवा नेत्याच्या अभिनंदनाचा उल्लेख आहे आणि सोबतीला ठळक इंग्रजीत लिहले आहे, 'DEJA VU'... अनेकांना या शब्दाचा अर्थ काही लागेना. लोकांनी आपापल्या पद्धतीने तर्क लढवले, काहींनी ज्याच्या संकल्पनेतून हा शब्द साकारला असावा, असे वाटते त्यांच्याकडे चौकशी केली. त्यातून समोर आलेला अर्थ आणि ज्यांच्यासाठी हा शब्द वापरला गेला आहे ती व्यक्ती, यात साधर्म्य शोधण्याचा प्रयत्न करताना अनेकांना ‘हे देजा वू काय हाय रे भाऊ?’ असा प्रश्‍न नक्कीच विचारला. आम्हीही या शब्दाचा अर्थ शोधला... वाचकांसाठी !

राज्याचे ज्येष्ठ नेते वसंतदादा यांचे नातू विशाल पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांच्या अभिनंदनाचे फलक सांगलीत लागले आहेत. वर्तमानपत्रात जाहिराती आहेत आणि त्यातील हा शब्द लक्ष वेधून घेतोय. खरं तर त्याचं आकलनं होईपर्यंत अनेकांनी डोके खाजवले आहे. विशाल पाटील प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्षपद स्विकारण्याबाबत नाराज आहेत, असे काही लोक सांगत होते. विशाल पाटील स्वतः काहीच बोलत नव्हते. ते बुधवारी रात्री मेळाव्यात बोलले. आता राज्यात काम करायचे, वसंतदादांचा गट बांधायचा, राज्यभर फिरायचे आणि पुन्हा एकदा सांगलीतून राज्यातील तिकीट वाटप व्हावे, अशी परिस्थिती निर्माण करायची, असे इरादा त्यांनी बोलून दाखवला.

हेही वाचा: तब्बल 18 गावठी बॉम्ब सापडल्याने खळबळ; एकाला अटक

जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेले विशाल पाटील अनपेक्षितपणे राज्यात गेले. त्यांच्या तिथे जाण्याशी या शब्दाचा ... ‘देजा वू’चा अर्थ जोडलेला आहे. हे असे पद आहे, जे आता नवे वाटत असले तरी कधीतरी इथे आपले प्रभुत्व होते, वसंतदादांच्या रुपाने राज्य व्यापले होते, पुन्हा ते दिवस आले आहेत, असा सकारात्मक विचार घेऊन पुढे जाण्याचा इरादा या शब्दांतून समोर आला आहे.

गुगल बाबाच्या पोटातून आम्ही या शब्दाचा अर्थ शोधून काढला. ‘देजा वू’ हा फ्रेंच शब्द आहे. त्याचा अर्थ ‘आधीही ज्याची जाणीव झाली होती असे’... असा मराठीत दिला आहे. हिंदीत थोडं अधिक सोपं करून, ‘जब अनजान जगह पर पहुंचकर लगे, यहाँ पहले भी आ चुके हैं...’ असा अर्थ होते. मराठीत काही ठिकाणी ‘स्वप्नवत’, असाही अर्थ घेतला जातो. कधीतरी स्वप्नात पाहिलेल्या गोष्टी प्रत्यक्ष समोर आल्या तर जी भावना होते, त्यालाही देजा वू असे म्हटले आहे. या शब्दांवरून अनेक इंग्रजी गाणी प्रसिद्ध झाली आहे. यू-ट्यूबवर त्याचे श्रवण करता येईल. यानिमित्ताने सांगलीकरांच्या शब्दकोशात भर पडली हेही कमी नाही.

हेही वाचा: बैलगाडा शर्यतींचा 'धुरळा' उडणार

loading image
go to top