
मास्क परिधान न करणाऱ्यांना काही तास कारावासाची शिक्षा देण्याचीही शिफारस केली आहे.
बेळगाव : सरत्या वर्षाला यंदा सर्वांना घरात बसूनच निरोप द्यावा लागण्याची शक्यता आहे. घराबाहेर पडल्यास पोलिसांच्या लाठीचा प्रसाद खाण्याची वेळ येऊ शकते. कोरोना नियंत्रण तांत्रिक सल्लागार समितीने कोरोना संसर्ग टाळण्यासाठी २६ डिसेंबर ते १ जानेवारीपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू करण्याची शिफारस केली आहे. शासनाने ही शिफारस मान्य केल्यास यंदा ‘न्यू इयर पार्टी’ घरात बसूनच करावी लागेल. तसेच मास्क परिधान न करणाऱ्यांना काही तास कारावासाची शिक्षा देण्याचीही शिफारस केली आहे.
न्यू इयर पार्टीची धूम सध्या वाढली आहे. यापूर्वी केवळ गल्लोगल्ली रात्री ओल्डमन पुतळा जाळून एकमेकांना शुभेच्छा दिल्या जात होत्या. मात्र, गेल्या काही वर्षात सेलिब्रेशनमध्ये बदल घडला आहे. मोठमोठी हॉटेल्स, धाबे, रिसॉर्ट चालकांकडून न्यू इयर पार्टी ठेवली जात असून मद्य आणि संगीताच्या तालावर थिरकत ३१ डिसेंबरची रात्र घालविली जाते. तर बाराच्या ठोक्यावर मोठी आतषबाजीही केली होते. सध्या लहान मुलेच ओल्डमन जाळत असून युवा वर्ग आणि मध्यमवयीन लोक हॉटेलमध्ये न्यू इयर पार्टी साजरी करताना दिसतात.
हेही वाचा - अरूण लाड आमदार झाले पण प्रत्येक कुंडलकरांना वाटतेय आपणच आमदार -
मार्चमध्ये लॉकडाउन लागू झाल्यानंतर प्रत्येक सण आणि उत्सवावर निर्बंध घातल्याने सध्या कोरोना नियंत्रणात आला आहे. राज्यात ऑक्टोबरनंतर कोरोना रुग्णांची संख्या घटली असून मृतांचा आकडाही कमी झाला आहे. पण, जागतिक पातळीवर कोराना नियंत्रणात येत असतानाच अमेरिका, ऑस्ट्रेलियासह युरोपीय देशांत कोरोनाची दुसरी लाट आली आहे. देशातही दिल्ली, गुजरात, महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. जानेवारीत कर्नाटकातही संसर्गाचा वाढता धोका आहे. याचा विचार करुन सल्लागार समितीने संचारबंदीची शिफारस शासनाकडे केली आहे. दुसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन समितीने रुग्णालयांतही तातडीची वैद्यकीय सेवा सज्ज ठेवण्यास सांगितले आहे.
समितीच्या शिफारशी
- २६ डिसेंबर ते १ जानेवारीपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू करावी
- रात्री ८ ते पहाटे ५ पर्यंत संचारबंदी असावी
- आणखी काही दिवस सर्व सण व उत्सवांवर निर्बंध हवेत
- रुग्णसंख्या वाढताच व्हेंटिलेटरसह सर्व वैद्यकीय सज्जता ठेवा
- न्यू इयरसाठी असणारा एकदिवसीय मद्यविक्री परवाना रद्द करा
- लग्नासाठी १०० तर अंत्यक्रियेसाठी उपस्थित संख्या २० ते ५० करा
- मास्क परिधान न करणाऱ्यांना कारावास द्या, दंडाची रक्कम वाढवा
हेही वाचा - 58 वर्षानंतर लाडांच्या घरात आमदारकी -
संपादन - स्नेहल कदम