कशाच्या भितीमुळे शाहूवाडी तालुक्‍यातील पाच गावात रब्बी क्षेत्र पडीक

No Crop In Rabi In Five Villages Of Shahuwadi Taluka
No Crop In Rabi In Five Villages Of Shahuwadi Taluka

कोल्हापूर - शाहूवाडी तालुक्‍यात पसरलेले जंगल आहे. त्यालगत चांदोली अभयारण्याची पश्‍चिम बाजू आहे. याच घनदाट जंगलाशेजारी असलेल्या शेतीत वन्यजीवांचा वावर दरवर्षी वाढतो आहे. या वन्यजीवांकडून उभी पिके फस्त केली जातात. दरवर्षी शेतकऱ्यांचे नुकसान होते म्हणून यंदा ऊखळू (ता. शाहूवाडी) सह पाच गावातील शेतकऱ्यांनी रब्बीची पिके घेणे थांबवले आहे. त्यामुळे जवळपास 250 हेक्‍टर शेती ओस पडली आहे. 

शाहूवाडी तालुक्‍यातील डोंगर उतारावर घनदाट झाडी आहे. झाडीचा गर्दपणा चांदोली अभयारण्याला जोडला आहे. त्यामुळे दिवसभर गर्द झाडीत बसलेले वन्यजीव सायंकाळनंतर खाली उतरतात. पहिल्यांदा ते जंगलाशेजारील ऊस किंवा भात शेतीत जातात. दिसेल ते हातातोंडाला आलेले पिक अर्धवट खातात. शेतीत इकडे तिकडे भटकत पिके तुडवून टाकतात. असा प्रकार काही ठराविक कालावधीत दरवर्षी घडतो. शेतीत दोन चार महिने राबल्यानंतर वाढ झालेले किंवा पूर्ण झालेले पिक वन्यजीवांच्या वावरामुळे नाश होते. ही या भागातील आता कायमची व्यथा बनली आहे. 

डिसेंबर - जानेवारीनंतर वन्यजीवांचा उपद्रव

वनविभाग त्यासाठी नुकसान भरपाई देतो; मात्र त्यासाठी पंचनामा करणे, संबधित अधिकाऱ्यांना कागदपत्रे व अन्यपुरक माहिती देणे त्याचा पाठपुरावा केल्यानंतर नुकसानापैकी 50 ते 60 टक्के भरपाई मिळते, असा अनुभव या भागातील शेतकऱ्यांनी घेतला आहे. दरवर्षी साधारण डिसेंबर - जानेवारीनंतर वन्यजीवांचा उपद्रव सुरू होतो. तो जूनच्या पहिल्या पावसापर्यंत सुरूच असतो. त्यामुळे याच कालावधीत येणारी पिके मका, गहू तसेच भाजीपाला असे उत्पादन घेणे शेतकऱ्यांनी बंद केले आहे. दरवर्षी ठराविक शेतकऱ्यांनी पिक घेणे बंद केले. त्यानुसार यंदातरी उखळू गावात 150 हेक्‍टर तर शित्तुर, खेडे, शिराळे, तोंडली, बिरळे, जांभूळ या गावातील जवळपास 100 हेक्‍टर असे एकूण अडीचशे हेक्‍टरवर पिक घेणे शेतकऱ्यांनी थांबवले आहे. 
दोन ते पाच महिने शेतात राबून घेतलेले पिक वन्यजीवाकडून संपविले जाते म्हणून "उखळू' सह अवती भोवतीच्या पाच गावातील जवळपास 250 हेक्‍टर जमीनीवर रब्बी पिक शेतकऱ्यांनी घेतलेले नाही. 

शेती न करण्यााचा निर्णय

""या भागात शेतीचे विशेषतः रब्बी पिकांचे गवे, रानडुक्‍कुर, माकडे, वानरे, मोर आदी वन्यजीवांकडून नुकसान होते. या परिसरात बिबट्या व वाघांचा वावर आहे. त्यांच्याकडून दुभत्या जनावरांवर हल्ले होतात. त्यामुळे परिसरातील लोकांना शेती करणे देखील मुश्‍कील बनले आहे. त्यामुळे यंदा शेती पिकवायची नाही, असा निर्णय बहुसंख्य शेतकऱ्यांनी घेतला आहे. वन्यजीवांचा बंदोबस्त वन व वन्यजीव विभागाने करावा, शेतीचे नुकसान होऊ नये, अशी मागणी ग्रामस्थांची आहे. त्याची दखल घ्यावी, यासाठी पाठपुरावा सुरू आहे.'' 
- राजाराम गोपाळ मुटल, सरपंच, ऊखळू (ता. शाहूवाडी) 

वाघ, बिबट्याची भिती 

अनेक भागात शेतकरी शेतीची राखण करतात. पक्षांकडून पिकांचे नुकसान होऊ नये, यासाठी मात्र ऊखळूपासून तीन ते चार किलोमीटर दूर जंगल हद्दी लगत शेती आहे. रस्ते नाहीत. रात्री अंधारात शेतीची राखण करणे शक्‍य नाही. कारण याच परिसरात बिबट्या, वाघांचा वावर आहे. रात्री शेतीकडे जाणे मुश्‍कील आहे, असे "शेती वाचवा' संघर्ष समितीचे हरीष कांबळे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com