एमएच अकरा; आता हॉर्न विसरा!

Horn
Horn

सातारा - सततच्या हॉर्न वाजविण्यामुळे होणारे ध्वनिप्रदूषण, त्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम व वाढणाऱ्या मानसिक तणावामुळे होणारी अपघातातील वाढ या सर्व गोष्टींवर प्रभावी उपाययोजना होण्यासाठी वाहनचालकांची मानसिकता सुधारणे अत्यंत आवश्‍यक आहे. त्यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून व जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या माध्यमातून सप्टेंबरमध्ये नो हॉर्न डे साजरा केला जाणार आहे. या माध्यमातून ‘एमएच ११ आता हॉर्न विसरा’ ही थिम वर्षभर राबविण्यात येणार आहे.

वाहनामध्ये हॉर्न हा अत्यावश्‍यक वेळेला वापरण्यासाठीच दिलेला असतो. परंतु, रस्त्यावरून जाताना हॉर्नवरचे बोट काढायचेच नाही, अशी अनेकांची मानसिकता असते. गरज नसताना अगदी समोर वाहन नसले तरी, अनेक जण हॉर्न वाजविताना दिसत असतात. गर्दीमध्ये तर अशांना आणखी चेव येतो. आपण किती वेळा हॉर्न वाजवतोय, त्याचा इतरांना काय त्रास होतोय, याचे भानही त्यांना नसते. 

सततच्या वाजणाऱ्या हॉर्नमुळे गर्भातील बाळापासून सर्वच वयोगटांतील व्यक्तींवर विपरित परिणाम होत असतात. अनेकांची मानसिक अस्वस्थपणा वाढते. त्यातून त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटण्याचा धोका असतो. विशेषतः वय झालेल्या व्यक्तींकडून असे प्रकार होण्याची शक्‍यता जास्त असते. त्यामुळे एकंदरच वैयक्तिक त्याचबरोबर सामाजिक स्वास्थ्यही हॉर्न वाजविण्यामुळे बिघडत असते.

वाहतूक व परिवहन विभागात काम करणारे तज्ज्ञ व अधिकाऱ्यांच्या आजवरच्या अभ्यासातून असे समोर आले आहे की, सतत हॉर्न वाजविण्याची सवय असलेल्यांकडून वाहतूक नियमांचे व वेगाचे पालन होत नाही. या उलट हॉर्न वाजविल्यास चालकाचे रस्त्यावर अधिक बारकाईने लक्ष राहते.

त्याच्याकडून वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन होते. वेगावर नियंत्रण असते. या सर्वांचा परिणाम म्हणून अपघातांची शक्‍यता अशा व्यक्तींकडून नगण्यच असते. त्याचबरोबर ध्वनिप्रदूषणामुळे होणाऱ्या त्रासापासून स्वतःची व समाजाचीही सुटका होण्यास मदत होते. 

त्यामुळे वाहनचालकांमध्ये नो हॉर्न संकल्पना ठामपणे रुजविण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहेत. पुणे व ठाणे येथेही त्यांनी हा उपक्रम चांगल्या प्रकारे राबविला होता. त्याला नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला. आता साताऱ्यातही हा उपक्रम रस्ता सुरक्षा समितीच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे.

त्यासाठी सप्टेंबरमध्ये नो हॉर्न डे पाळला जाणार आहे. तेथून पुढे ‘एमएच ११ आता हॉर्न विसरा’ हा उपक्रम कायमस्वरूपी राबविला जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com