"नो रिस्पॉन्स' : टोल-फ्री'ची टोलवाटोलवी

दौलत झावरे 
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

जिल्ह्यातून आजअखेरपर्यंत फक्‍त 50 तक्रारी दाखल झाल्या आहेत. ही योजना सर्वसामान्यांपर्यंत पोचवायची असेल, तर त्याची माहिती प्रत्येक ग्रामपंचायत व पंचायत समितीमध्ये फलकावर लावणे गरजेचे असताना, त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे जिल्ह्यातून फारसा प्रतिसाद मिळत नाही. 

नगर : गावांतील समस्यांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा व्हावा, यासाठी जिल्हा परिषद प्रशासनातर्फे "टोल-फ्री' क्रमांकाची सेवा सुरू करण्यात आली आहे. गावात पिण्याचे पाणी वेळेवर मिळत नाही, ग्रामसेवक वेळेवर येत नाहीत, शाळेत शिक्षक हजर नाहीत, यांसह विविध तक्रारी थेट जिल्हा परिषदेत करण्याची सुविधा या क्रमांकावरून देण्यात आली आहे. 

जाणून घ्या - लव्ह के लिए कुछ भी... शिक्षिकेनं विद्यार्थ्याला पटवलं अन.. 

जिल्हा परिषदेच्या "टोल-फ्री' क्रमांकावर तक्रारी कराव्यात, यासाठी केवळ आवाहन करण्यात आले. तथापि, त्याबाबत अपेक्षित जनजागृती न झाल्याने या सुविधेचा अपेक्षित वापर दिसून येत नाही. या सुविधेस नोव्हेंबर 2019मध्ये सुरवात झाली. त्यावर 22 जानेवारी 2020अखेरपर्यंत फक्त 50 तक्रारी दाखल झाल्या आहेत. 
पाणी येत नाही, शिक्षक शाळेत उशिरा येतात, यांसारख्या विविध तक्रारी ग्रामस्थांना करायच्या असतात. त्या मांडण्याची संधी देऊन समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी 18002332429 हा टोल-फ्री दूरध्वनी क्रमांक कार्यान्वित केला आहे. यावर येणाऱ्या तक्रारींची नोंद करण्यासाठी एका कर्मचाऱ्याची नियुक्तीही करण्यात आली आहे. 

तक्रारींचा ओघ कमी 
या सेवेमुळे जनतेची कामे वेगाने होऊन प्रश्‍न सुटण्यास मदत होईल, असे सर्वांना वाटत होते. या योजनेचे जिल्हा परिषदेच्या सदस्यांनीही स्वागत केले होते. मात्र, योजनेचा प्रचार व प्रसार करण्यात प्रशासन अपयशी ठरले. त्यामुळे या योजनेची माहिती तळागाळापर्यंत न पोचल्याने त्यावर येणाऱ्या तक्रारींचा ओघ कमी असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातून आजअखेरपर्यंत फक्‍त 50 तक्रारी दाखल झाल्या आहेत. ही योजना सर्वसामान्यांपर्यंत पोचवायची असेल, तर त्याची माहिती प्रत्येक ग्रामपंचायत व पंचायत समितीमध्ये फलकावर लावणे गरजेचे असताना, त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे जिल्ह्यातून फारसा प्रतिसाद मिळत नाही. 

"टोल-फ्री' क्रमांकावर... 
"टोल-फ्री' सेवा सुरू होऊन अडीच महिने झाले; परंतु संगमनेर व अकोले तालुक्‍यांतून त्यावर एकही तक्रार अद्याप नाही. - कोपरगाव तालुक्‍यातून सर्वाधिक नऊ तक्रारी. श्रीरामपूर व श्रीगोंदे तालुक्‍यांतून प्रत्येकी एक तक्रार. 

रविवारी फक्त रिंग वाजते 
"टोल-फ्री' क्रमांकावरील ही सेवा जिल्हा परिषदेच्या कामकाजाच्या दिवशीच सुरू असते. रविवारी व शासकीय सुटीच्या दिवशी फोन केल्यास फक्त रिंग वाजते. त्या दिवशीही येथे कर्मचाऱ्याची नियुक्ती होणे गरजेचे आहे. 

जनतेच्या समस्यांच्या तक्रारी जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी 18002332429 या "टोल-फ्री' क्रमांकाची सेवा सुरू केली आहे. या क्रमांकावर जनतेने आपल्या गावातील समस्या मांडाव्यात, असे जिल्हा परिषदेचे 
उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No Response to Toll-Free number