कोल्हापुरातील गगनगिरी पार्क 14 वर्षांपासून पाण्यापासून वंचित

कोल्हापुरातील गगनगिरी पार्क 14 वर्षांपासून पाण्यापासून वंचित

कोल्हापूर - फुलेवाडी रिंग रोडपासून केवळ एका किलोमीटरवर असलेल्या आणि शहराच्या पश्‍चिमेस बोंद्रेनगर परिसरात वसलेल्या गगनगिरी पार्कमधील नागरिकांना तब्बल चौदा वर्षे पाण्यासाठी वनवास भोगावा लागतो आहे. आजही दररोज सकाळी दोन तास पाण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागतो. परिसरातील शेतीसाठीचे पाणी हाच त्यांना प्रमुख आधार ठरतो आहे.

दरम्यान, पाडळी खुर्द (ता. करवीर) ग्रामपंचायत आणि शहराच्या सीमेवर ही कॉलनी असल्याने दोन्ही घरचा पाहुणा उपाशी, असाच काहीसा अनुभव येथील साठ ते सत्तर कुटुंबांना येतो आहे. फुलेवाडी रिंग रोडच्या पश्‍चिमेस २००६ पासून ही कॉलनी तयार झाली. आजवर येथे साठ ते सत्तर कुटुंबे वास्तव्यास असून बहुतांश घरे धनगर समाजातील आहेत. नारळ काढणे, झाडे तोडणे किंवा घरकाम करणे अशी मोलमजुरीची कामे ते करतात. सकाळी कामावर जाण्यापूर्वी किमान दोन तास त्यांना पाण्यासाठी झगडावे लागते. परिसरातील दोन शेतकरी त्यांच्या शेतीसाठीचे पाणी या कुटुंबांना देतात. कधी कधी तर मुलांना केवळ पाण्यासाठी शाळा चुकवावी लागते, तर काहींना कामे बाजूला सारून घरी थांबावे लागते. लोकप्रतिनिधींसह प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीच सकारात्मक कार्यवाही आजअखेर झालेली नाही.

परिसरातील शेतकऱ्याकडून पाणी मिळत असल्याने फक्त सकाळी पाणी भरावे लागते. आई-वडील मोलमजुरीसाठी शहरात जातात. त्यामुळे कॉलेजला जाण्यास वेळ होतो.
-अजित गावडे,
महाविद्यालयीन तरुण.

मुलांबाळांची शाळा, घरकाम आणि सगळ्यांत मोठं काम म्हणजे पाणी भरायला लागत असल्यामुळं कामाला जायला वेळ होतो. त्यामुळे कधी कधी अर्धा पगार मिळतो. 
- बयाबाई गावडे.

दररोज पाणी भरण्यासाठी वेळ द्यावा लागत असल्याने शाळेला उशीर होतो. त्यामुळे कधी कधी शाळा चुकते. 
- सायली धोंडीराम,
 घोडके, विद्यार्थिनी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com