हुरमूंज लावलेली बैलजोडी स्पर्धेतून बाद ठरविण्याचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जुलै 2019

गडहिंग्लज - शिवाजी चौक मित्र मंडळातर्फे महाराष्ट्र बेंदूर सणानिमित्त दरवर्षी सदृढ बैलजोडी स्पर्धा होतात. यंदाची स्पर्धा 16 जुलैला होणार असून या स्पर्धेत हुरमूंज लावलेली बैलजोडी स्पर्धेतून बाद ठरविण्यात येणार आहे. हुरमूंजने बैलांना व हौशी नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेवून मंडळाने हा निर्णय घेतला असून कोरड्या रंगाने बैलजोडी सजवण्याचे आवाहन स्पर्धकांना करण्यात आले आहे.

गडहिंग्लज - शिवाजी चौक मित्र मंडळातर्फे महाराष्ट्र बेंदूर सणानिमित्त दरवर्षी सदृढ बैलजोडी स्पर्धा होतात. यंदाची स्पर्धा 16 जुलैला होणार असून या स्पर्धेत हुरमूंज लावलेली बैलजोडी स्पर्धेतून बाद ठरविण्यात येणार आहे. हुरमूंजने बैलांना व हौशी नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेवून मंडळाने हा निर्णय घेतला असून कोरड्या रंगाने बैलजोडी सजवण्याचे आवाहन स्पर्धकांना करण्यात आले आहे.

सदृढ बैलजोडी स्पर्धेचे यंदाचे 19 वे वर्ष आहे. लाखो रूपयांची बक्षीसे या स्पर्धेसाठी असतात. प्रत्येक सहभागी स्पर्धकाचा मानसन्मान केला जातो. महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात दरवर्षीच या स्पर्धेविषयी औत्सुक्‍य असते. जुलै महिना लागला की या स्पर्धेचे वेध हौशींना लागतात. स्पर्धेदिवशी बैलजोड्या पाहण्यासाठी हजारो शौकीनांची गर्दी असते. लाखो रूपये खर्चून वाद्यांच्या गजरात मिरवणुका काढल्या जातात. बैलजोड्याही या स्पर्धेत मोठ्या प्रमाणात सहभागी होतात.

बेंदूर म्हटले की लाल-तांबूस रंगाचा हुरमूंज आणि तेल ठरलेले. ही पारंपारिक पद्धत बंद करण्याचे मंडळाने ठरविले आहे. दरवर्षी तेलातील हुरमूंजाने बैलजोडी आणि त्यासोबत असणारे पशूपालक व समर्थकही हुरमूंजाने माखलेले असायचे. रस्त्यावर हा तेलकट हुरमूंज पडल्याने रस्ता निसरट होत होती. बाजारपेठेतून बैलजोडीची मिरवणूक निघत असल्याने व्यापाऱ्यांनाही त्याचा त्रास व्हायचा. बैलजोडी मिरवणूक पाहण्यासाठी येणाऱ्या हौशी नागरिकांसह महिलांनाही हे आवडायचे नाही. अंगावर थापलेल्या तेलकट हुरमूंजाने बैलांच्या आरोग्यावरही परिणाम व्हायचा. यामुळे गेल्या काही वर्षापासून याची तक्रारही मंडळाकडे नोंदवण्यात आली होती. 

दरम्यान, मंडळाने यंदा घेतलेला निर्णय स्वागतार्ह ठरत आहे. मंडळाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात स्पर्धेत सहभागी होणारी बैलजोडी हुरमूंजाने माखलेली असल्यास ती बैलजोडी रद्द करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. बैलांना सजवण्यासाठी कोरड्या रंगाचा वापर करण्यास परवानगी दिली आहे. मंडळाने आधी कोणताही रंग बैलांना न लावण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, शेतकऱ्यांच्या विनंतीचा विचार करून हुरमूंज ऐवजी कोणतेही कोरडे रंग लावण्यास परवानगी दिल्याचे मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब भैसकर यांनी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Norms defined for bull couple competition