एटीएमसमोर जनावरे बांधून बंद ठेवणार 

note-ban
note-ban

कोल्हापूर - नोटाबंदीच्या पन्नास दिवसांनंतरही बॅंकांचे व्यवहार सुरळीत सुरू न झाल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे सोमवारी (ता.9) मोर्चा काढून तावडे हॉटेल येथे महामार्गावर रास्ता रोको होणार आहे. याच दिवसी सर्व एटीएमसमोर जनावरे बांधून ती बंद ठेवली जाणार आहेत. हे आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहन आमदार हसन मुश्रीफ यांनी आज कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले. 

या बैठकीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पक्षाचे नेते खासदार शरद पवार यांच्याबद्दल केलेल्य वक्तव्याचा तसेच राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वक्‍तव्याचा निषेध केला. भाजपची चमेचगिरी करण्यासाठी खासदार शेट्टी यांनी शेतकऱ्यांचा अपमान केल्याचा आरोपही या वेळी केला. 

नोटाबंदीच्या निर्णयाविरुद्ध राष्ट्रवादीने सोमवारी राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कोल्हापुरात या दिवशी होणाऱ्या रास्ता रोको आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी आज प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक ताराबाई पार्क येथील पक्षाच्या कार्यालयात झाली. माजी आमदार के. पी. पाटील अध्यक्षस्थानी होते. 

आमदार मुश्रीफ म्हणाले, ""पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर करून पन्नास दिवस मला साथ द्या, असे सांगितले होते. त्याप्रमाणे पन्नास दिवस होऊन गेले तरी बॅंकांमधून अद्याप खातेदारांना पैसे मिळू शकत नाहीत. जिल्हा बॅंकांना पुरेशी रक्‍कम दिली जात नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेचे हाल सुरू आहेत. खात्यावर पैसे असूनही त्यांना मिळू शकत नाहीत. सत्तेत असणारी शिवसेना पहिल्या दिवसापासून नोटाबंदीच्या निर्णयाविरुद्ध आहे. पन्नास दिवसांनंतरदेखील परिस्थिती बदललेली नाही. यावर स्वत:ला समाजसेवक म्हणवून घेणारे अण्णा हजारे काही बोलत नाहीत. त्यांनी कधी याबाबत तोंड उघडले नाही आणि राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांच्यावर मात्र ते खोटेनाटे आरोप करत आहेत. त्यांचा निषेध करतो. शेतकऱ्यांच्या जीवावर निवडून आलेले नेते खासदार शेट्टी यांची अवस्था आता "विनाशकाले विपरीत बुद्धी' अशी झाली आहे. शिवस्मारकाच्या कार्यक्रमाला त्यांना कोणी विचारले नाही. त्यामुळे चिडून त्यांनी त्यावेळी भाजपवर आरोप केले. त्याच भाजपची चमचेगिरी करण्यासाठी त्यांनी आता नोटाबंदीमुळे नव्हे तर जादा उत्पादनामुळे शेतीमालाचे भाव पडले असल्याचे वक्‍तव्य करून त्यांनी शेतकऱ्यांचा अपमान केला आहे.'' आंदोलनात नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी गावागावांत आणि शहरातील कॉलनीमध्ये छोट्या, छोट्या बैठका घ्याव्यात. प्रत्येक तालुक्‍यातून किमान पाचशे कार्यकर्ते येतील यासाठी नियोजन करावे, असे आवाहनही त्यांनी केले. 

जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील म्हणाले, ""सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांना नोटाबंदीची सर्वाधिक झळ बसली आहे. नोटाबंदीच्या माध्यमातून सहकार चळवळ, सहकारी बॅंका मोडण्याचा सरकारचा डाव हाणून पाडण्यासाठी या आंदोलनात सहभागी व्हावे.'' 

या वेळी महापौर हसीना फरास, कागल नगराध्यक्ष माणिक माळी, उपनगराध्यक्ष नितीन दिंडे, महिला जिल्हा अध्यक्ष संगीता खाडे, शहर अध्यक्ष जहिदा मुजावर, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आर. के. पोवार, माजी आमदार नामदेवराव भोईटे, बी. एन. पाटील- मुगळीकर, आदिल फरास तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत अनिल साळोखे यांनी केले. बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर यांनी आभार मानले. 

...तर चेस्ट बॅंका बंद पाडू 
ग्रामीण भागासाठी चाळीस टक्‍के रक्‍कम देण्याचे जाहीर केले आहे. जिल्हा बॅंका जिल्ह्याची अर्थवाहिनी म्हणून ओळखले जातात. त्यामुळे जिल्हा बॅंकांना जर निधी उपलब्ध करून दिला नाही तर चेस्ट बॅंका बंद पाडू, असा इशारा या बैठकीत दिला. 

खासदार धनंजय महाडिक व आमदार संध्यादेवी कुपेकर हे पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी गेले असल्यामुळे ते या कार्यक्रमास उपस्थित राहू शकत नसल्याचे त्यांनी कळविले आहे. माजी खासदार निवेदिता माने यांनीदेखील काही अपरिहार्य कारणास्तव बैठकीस उपस्थित राहू शकत नसल्याचे कळविले आहे. 
ए. वाय. पाटील, जिल्हाध्यक्ष 

भाजप सरकारकडून अनेक घोटाळे 
भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून चिक्‍की घोटाळा, आदिवासी कुपोषण घोटाळा, पदवी घोटाळा आणि सध्या गाजत असलेल्या नोटाबंदीचा घोटाळा आणि त्यामुळे त्रस्त झालेला सामान्य नागरिक आणि शेतकरी यावर कधीही भाष्य न करणारे अण्णा हजारे हे खासदार शरद पवार यांच्यावर आरोप करून प्रसार माध्यमांमध्ये प्रतिमा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे पत्रक कोल्हापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष लालासाहेब जगताप यांनी दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com