बफर झोनमधील तब्बल इतक्या अतिक्रमण धारकांना नोटिसा

 बफर झोनमधील तब्बल इतक्या अतिक्रमण धारकांना नोटिसा

सांगली : यंदा पावसाळ्यापूर्वीच महापालिकेने नालेसफाई सुरू केली आहे. त्यापाठोपाठ आता बफरझोनमधील सुमारे तीनशेवर अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तीस दिवसांत अतिक्रमण काढून घेतले नाही तर महापालिका हे अतिक्रमण उद्‌ध्वस्त करेल असा इशारा यामध्ये देण्यात आला आहे. 

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये महापालिकेला महापुराचा मोठा फटका बसला. हजारो कोटींचे नुकसान महापुराच्या दणक्‍याने झाले होते. त्यावेळी बफरझोनमधील अतिक्रमण आणि नालेसफाई न होणे हे एक महापुराचे कारण असल्याचे समोर आले होते. त्यामुळे यंदा महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी पावसाळापूर्व नियोजनावर भर दिला आहे.

महापालिका क्षेत्रातील नैसर्गिक नाल्याच्या बफर झोनमध्ये येणाऱ्या सर्व अतिक्रमणधारकांना महापालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. सुमारे तीनशेहून अधिक अतिक्रमणधारकांचा समावेश असल्याचे समजते. नालेसफाईचे काम हाती घेतल्यानंतर आता नाल्यांवरील अतिक्रमणांकडेही महापालिकेने लक्ष वळवले आहे. 

महापालिका क्षेत्रात नैसर्गिक नाल्याच्या बफर झोनमध्ये सुमारे 300 हून अधिक अतिक्रमणे असल्याची माहिती आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली होती. यासर्व अतिक्रमणधारकांना नोटीस बजावण्यात येणार असून त्यांनी स्वत: अतिक्रमण काढून घेतले नाही तर महापालिकेकडून काढण्यात येतील असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यानुसार महापालिकेने आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 च्या कलम 41 (2) अन्वये नोटिसा बजाविण्यास सुरवात केली आहे.

अनधिकृत बांधकामामुळे पावसाळा काळात पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण होतो. त्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते. नागरिकांच्या घरात पाणी जाऊन जीवित तसेच वित्तहानी होऊ शकते. त्यामुळे नोटीस मिळाल्यापासून 30 दिवसांच्या आत अनधिकृत बांधकामे काढून घ्यावीत. अन्यथा महापालिकेकडून ती उद्‌ध्वस्त करण्यात येतील असा इशारा नोटीसमध्ये देण्यात आला आहे. 

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात जवळपास 86 छोटे मोठे नैसर्गिक नाले आहेत. गेल्या वर्षी नाल्याच्या बफर झोनमध्ये असलेल्या अनधिकृत बांधकाम, अतिक्रमणामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह खंडित झाला. परिणामी धोक्‍याची पातळी गाठण्यापूर्वीच पुराचे पाणी सांगलीत शिरले. या भीषण अनुभवाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी महापालिकेने गांभीर्याने नालेसफाईला हात घातला आहे. त्यासाठी एक कोटी 25 लाख रुपयांचा निधी यावेळी नालेसफाईवर खर्च करण्यात येणार आहे. नाल्यांची केवळ सफाई न करता खोलीकरण आणि रुंदीकरणावर भर देण्यात आला आहे. यासाठी आवश्‍यक ती संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. ड्रोनद्वारे नालेसफाईवर लक्ष ठेवण्यात येत आहे. ड्रोनच्या सहाय्याने नालेसफाईच्या कामांना टॅगिंग केले जात आहे. 

प्लॉट पाडून विकणारे नामानिराळेच 
नैसर्गिक नाल्यांवर बफरझोनमध्ये अतिक्रमण केलेल्यांना महापालिकेने नोटीस बजावली आहे. मात्र ज्यांनी या नाल्यांवर प्लॉट पाडून त्यांची विक्री केली ते नामानिराळेच राहिले आहेत. नाले अडवून त्यावर अतिक्रमण केल्याने आज शहराची बकाल अवस्था झाली आहे. त्यामुळे नाल्यांवर मूळ अतिक्रमण करणारे प्लॉट पाडणारेच होते. पण, ते आता विक्री करून मोकळे झाले असून खरेदी करणारे अडकले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com