शिक्षकांना नोटिसांचा दंडुका 

शिक्षकांना नोटिसांचा दंडुका 

सातारा - राष्ट्रीय अधिवेशनाला जाण्यासाठी प्राथमिक शिक्षकांनी नीतीमत्तेचा विचार न करताच गोवा वारी केलेल्या शिक्षकांना आता नोटिसांचा दंडुका सहन करावा लागणार आहे. बहुतांश शिक्षकांनी रजा मंजूर न करताच "दांडी' मारल्याने जिल्हा परिषदेच्या सुमारे 40 टक्‍के शाळा बंद राहिल्या. त्यावर "सकाळ'ने आवाज उठविल्यानंतर प्राथमिक शिक्षण विभागाने संबंधित शिक्षकांना नोटिसा पाठविल्या आहेत. तसेच शाळा सुरू ठेवण्याची व्यवस्था केली. 

अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय अधिवेशन व शिक्षण परिषद गोवा येथे शुक्रवार (ता. आठ) व शनिवारी (ता. नऊ) होणार आहे. त्यासाठी ग्रामविकास विभागाने एक फेब्रुवारी रोजी परिपत्रक काढून राज्यातील प्राथमिक शिक्षकांना दहा ते 12 जानेवारीपर्यंत तीन दिवसांची विशेष नैमत्तिक रजा मंजूर केली होती. मात्र, त्यामध्ये शाळा बंद न ठेवता, तसेच विद्यार्थ्यांचा अध्यापनाचा भाग राहिलेला जादा तास घेऊन अन्यथा रविवारी अथवा सुटीच्या दिवशी शाळा घेऊन तो शिकविण्याची अट घालण्यात आली होती. 

मात्र, जिल्ह्यातील अनेक प्राथमिक शिक्षकांनी त्याला हारताळ फासत थेट दहा दिवसांच्या रजा टाकल्या. केवळ व्हॉट्‌सऍप या सोशल मेसेंजरवर फिरणाऱ्या मेसेजवरून दहा दिवसांच्या रजा टाकल्या असल्याचे समोर येत आहे. त्यामध्ये पाटण तालुक्‍यातील सर्वाधिक एक हजार 308 पैकी तब्बल एक हजार 107 शिक्षक सात ते नऊ या कालावधीत गोवा वारीवर गेले. त्यामुळे तब्बल 277 शाळा बंद राहिल्या. त्यापाठोपाठ खंडाळ्यातील पाचही केंद्रप्रमुख, 395 पैकी 239 प्राथमिक शिक्षक रजेवर गेले. याशिवाय फलटणमधील 711, कऱ्हाडमधील सुमारे 750 शिक्षक रजेवर गेले. मात्र, या शिक्षकांनी शाळांचे कामकाज सुरू राहील, याबाबत दक्षताही घेण्याची नीतीमत्ता राखली नाही. परिणामी, सुमारे 40 टक्‍के शाळांमध्ये विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययन करावे लागले, तर एक शिक्षकावर संपूर्ण शाळेची जबाबदारी येऊन ठेपली. त्यावर "सकाळ'ने मंगळवारी "गुरुजी गोव्यात, विद्यार्थी घरात' या मथळ्याखाली बातमी प्रसिध्द करून अशा शिक्षकांचा कारभार चव्हाट्यावर आणला. त्याची दखल घेत प्राथमिक शिक्षण विभागाने सध्या सर्वच शाळा सुरू राहतील, यासाठी नियोजन केले आहे. तसेच अधिवेशनासाठी तीन दिवसापेक्षा जास्त रजा घेतलेले, केवळ रजेचा अर्ज दिलेले पण मंजुरी न घेतलेल्या शिक्षकांना नोटिसा पाठविल्या आहेत. त्यामुळे अशा शिक्षकांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. 

सभापती तालुक्‍याकडे बघा!  
शिक्षण सभापती राजेश पवार हे पाटण तालुक्‍यातील आहेत. त्यांच्याच तालुक्‍यात 527 पैकी तब्बल 277 शाळा बंद राहिल्या आहेत. आधीच 121 शिक्षक रिक्‍त आहेत. आश्‍चर्य म्हणजे अधिवेशन रजेवर गेलेल्या एकाही शिक्षकाची रजा गटशिक्षणाधिकारी आर. पी. निकम यांनी मंजूर केलेली नाही. त्यामुळे श्री. पवार यांनी कटाक्षाने अशा शिक्षकांवर कारवाई करावी. 

""शासनाने अधिवेशनासाठी तीन दिवसांची रजा मंजूर केली आहे. केवळ रजा देवून, ती मंजूर न करताच रजेवर गेलेल्या शिक्षकांना नोटिसा पाठविल्या आहेत. संबंधित शिक्षकांवर कारवाई करणार आहोत.'' 
-एच. व्ही. जाधव, उपशिक्षणाधिकारी, प्राथमिक 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com