रेठरे धरण परिसरातील क्रुरकर्मा भावशा पाटील पंढरपुरात जेरबंद 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 मे 2018

तात्पुरत्या बेड्या काढल्यानंतर हिसडा मारत न्यायालयाच्या दुसऱ्या मजल्यावरुन उड्या मारून त्याने पलायन केले होते. तेव्हापासून फरारी असलेल्या भावशाच्या सांगली पोलिसांनी पंढरपूर येथे मुसक्‍या आवळल्या.

इस्लामपूर - राष्ट्रवादीचे माजी आमदार मानसिंगराव नाईक यांचे मेहुणे संताजी खंडागळे यांच्यासह तिघांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी रेठरे धरण (ता. वाळवा) येथील कुख्यात गुंड भाऊसाहेब उर्फ भावशा वसंत पाटील याला आज अटक झाली. ऑक्‍टोबर 2010 मध्ये इस्लामपूर न्यायालयाच्या आवारातून पोलिसांनी त्याला बेड्यांसह आणले होते. त्यावेळी तात्पुरत्या बेड्या काढल्यानंतर हिसडा मारत न्यायालयाच्या दुसऱ्या मजल्यावरुन उड्या मारून त्याने पलायन केले होते. तेव्हापासून फरारी असलेल्या भावशाच्या सांगली पोलिसांनी पंढरपूर येथे मुसक्‍या आवळल्या. पोलिसांच्या या कारवाईमुळे भावशाच्या दहशतीखाली अडकलेल्या रेठरेधरण पंचक्रोशीतील शेकडो कुुटुंबांना दिलासा मिळाला. 

गावातील एका महिलेशी केलेल्या गैरवर्तनाबद्दल संताजी खंडागळे यांनी भावशाला जाब विचारला होता. हा राग मनात धरुन भावशाने संताजी यांचा 13 नोव्हेंबर 2011 ला गोळीबार केला होता. तेव्हापासून संताजी यांना पोलिस संरक्षण देण्यात आले होते. चारवर्षापुर्वी झालेल्या विधानसभा निवडणूकीच्या आचारसंहितेचे कारण सांगून संताजी यांचे संरक्षण काढून घेतले होते. ही संधी साधून भावशाने डाव साधला होता. 1 डिसेंबर 2016 ला भावशाने रापी व सत्तूर सारख्या धारदार शस्त्राने वार करुन खून केला होता. यावेळी त्याला अडवणाऱ्या संताजी यांची पत्नी राजश्री तसेच शेजारी विश्‍वास जाधव यांच्यावरही त्याने हल्ला केला होता. या खून प्रकरणातील मंथन दत्तात्रय धुमाळ, जयपाल मानसिंग गिरासे, शशिकांत अरुण पाटील या भावशाच्या साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तर भावशा पळून गेला होता. 

2005 मध्ये इस्लामपूर पोलिस ठाण्यात त्याच्यावर चोरीचे सहा गुन्हे दाखल आहेत. भावशाने 2006 मध्ये संताजी खंडागळे यांचे वडील दादासाहेब खंडागळे यांच्या बरोबर असणाऱ्या मोहन पाटील यांचा सत्तुरने वार करत पहिला खून केला होता. मोहन पाटील दादासाहेब खंडागळे यांना आपल्याबाबत माहिती पुरवत असल्याची भावशाला शंका होती. त्यामुळे 14 जानेवारी 2010 ला मोहन पाटील यांचा मुलगा धनाजी याचा भावशाने खून केला. संताजी यांच्या सांगण्यानुसारच धनाजीने भावशाच्या विरोधात फिर्याद दिल्याची शंका भावशाला होती. धनाजी हा भावशाचा जिवलग मित्र होता. त्याने खुनाची फिर्याद पाठीमागे घ्यावी असा तगादा धनाजीमागे लावला होता. धनाजीने यास नकार दिल्याने तो चिडून होता. 

विटा येथील कुप्रसिद्‌ध गुंड संजय कांबळे याचा भावशाने सुपारी घेवून खून केल्याचा संशय होता. विटा पोलिसांच्या तपासपथकाने छत्तीसगढ मधून भावशाला ताब्यात घेतले होते. 18 ऑक्‍टोबर 2010 या दिवशी इस्लामपूर येथील न्यायालयात हजर करण्यासाठी भावशाच्या हातातील बेड्या काढल्यानंतर भावशाने पोलिसांना हिसडा दिला, न्यायालयाच्या दुसऱ्या मजल्यावरुन डोळ्याचे पाते लवते न लवते तोपर्यंत त्याने पाच-पाच पायऱ्यावरुन उड्या मारत जिन्यावरुन खाली आला व पसार झाला. तेव्हापासून आजपर्यंत तो फरारी होता. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: The Notorious Hooligan Bhavsha Patil is arrested by police in Pandharpur