कादंबरी... एका पोलिसपाटलाची...!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 एप्रिल 2017

बहात्तराव्या वर्षी देवाळेच्या महादेव पाटील यांनी लिहिली ‘गोजा’ 

बहात्तराव्या वर्षी देवाळेच्या महादेव पाटील यांनी लिहिली ‘गोजा’ 

कोल्हापूर - गावात पोलिसपाटीलकी करत असतानाच वाचन आणि लिखाणाचा छंद जडला. ‘निर्णय’ नावाची एक छोटी कथा लिहिली आणि एका स्पर्धेसाठी पाठवली. स्पर्धेचा निकाल वर्ष झाले तरी काही लागेना. त्यामुळे संयोजकांकडे जाऊन कथेच्या मूळ प्रतीची मागणी केली, मात्र तो द्यायला टाळाटाळ करू लागला. अखेर त्याच्याशी वाद घालून कथेची मूळ प्रत मिळवली; मात्र त्याचवेळी याच कथेवर सेवानिवृत्तीनंतर कादंबरी लिहायची, असा त्यांनी निर्धार केला. पोलिसपाटीलकीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी ‘गोजा’ ही कादंबरी लिहूनही पूर्ण केली आणि आता त्याचे प्रकाशनही लवकरच होणार आहे. देवाळे (ता. पन्हाळा) येथील बहात्तर वर्षीय महादेव पाटील यांचा हा साहित्य प्रवास. 

श्री. पाटील यांचे मूळ गाव देवाळे, मात्र तिसरीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण केर्ली येथे आजोळी झाले. त्यानंतर आठवीपर्यंतचे देवाळे येथे आणि नववीला ते येथील न्यू हायस्कूलमध्ये आले. मात्र त्यानंतर त्यांनी शाळा सोडली. १९६७ ला ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडूनही आले आणि पुढे वर्षभरातच त्यांची पोलिसपाटील पदी निवड झाली. त्यानंतर सलग ३८ वर्षे त्यांनी या पदावर इमाने-इतबारे सेवा दिली. पोलिसपाटलांच्या संघटनेचे कामही केले. २००६ मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर ते कादंबरीच्या लिखाणात रमले. ‘दंडवत’, ‘आईचं डोरलं’ अशा छोट्या कथाही लिहिल्या. मात्र, ‘गोजा’ ही कादंबरी त्यांच्या या साऱ्या प्रवासातील एक महत्त्वाची साहित्यकृती. 

पुण्याच्या अरिहंत पब्लिकेशनने ही जबाबदारी घेतली. आंतरजातीय विवाह केलेल्या गोजाचे जीवन त्यांनी या कादंबरीतून मांडले आहे. जातीबाह्य विवाहामुळे जगण्याचा झालेला गुंता, जात पंचायत आणि त्यातून येणाऱ्या विविध अनिष्ट प्रथा, यावरही त्यांनी थेट भाष्य केले आहे. लवकरच ज्येष्ठ साहित्यिक प्रा. चंद्रकुमार नलगे यांच्या हस्ते या कादंबरीचे प्रकाशन 
होणार आहे.

विविध कारणांनी माणसाच्या आयुष्यात संघर्ष येतोच, पण जाती-पातींचा तिढा अजूनही सुटलेला नाही. याच पार्श्‍वभूमीवर ही कादंबरी लिहायला घेतली आणि आता ती वाचकांच्या भेटीस येणार आहे.
- महादेव पाटील

Web Title: novel police patil