अबब..! उजनी धरणाच्या जलाशयात सापडला 17 किलो वजनाचा मासा

राजाराम माने : सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

- परिसरातील उजनी पाणलोट क्षेत्राच्या फुगवट्याच्या गोड्या पाण्यात एवढा मोठा सापडण्याची ही पहिलीच वेळ असल्याने या माशाला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली 
- हा मासा भिगवण (ता. इंदापूर) येथील मच्छी मार्केटमध्ये विक्रीसाठी नेला असता 260 रुपये प्रतिकिलो दराप्रमाणे विकला जाऊन एक माशाचे चार हजार 440 रुपये मिळाले. 
- पुण्यातील व्यापाऱ्याने हा मासा खरेदी केला. 

केत्तूर :  तुडुंब भरलेल्या उजनी जलाशयात मासेमारी करीत असताना रविवारी (ता. 17) सकाळी बापू नगरे या मच्छीमाराला केत्तूर नंबर एक (ता. करमाळा) परिसरातील कोकणे मळा येथे 17 किलो वजनाचा कटला जातीचा मासा जाळ्याद्वारे मासेमारी करीत असताना जाळ्यात सापडला.

या वर्षी उन्हाळ्यात उजनी जलाशयाचा पाणीसाठा ऐतिहासिक अशा वजा 59 टक्के पातळीवर गेला होता, त्यामुळे जलाशयातील मासे संपुष्टात आले होते. त्यातच सध्या उजनी जलाशय पूर्ण क्षमतेने भरलेले असूनही मच्छीमारांच्या जाळ्यात मात्र मासेच सापडत नसल्याने मच्छीमार संकटात आले. यापूर्वी दररोज 40 ते 50 किलो मासे सापडत होते; मात्र आता केवळ तीन ते पाच किलोच माशांवर त्यांना समाधान मानावे लागत आहे. त्यामुळे पूर्ण भरलेल्या जलाशयात मासेमारी सध्या धोक्‍यात आली आहे, यामुळे मच्छीमार शेतमजूर म्हणून कामाला जाणे पसंत करू लागले आहेत. 

मच्छिमार म्हणतात....
उजनी जलाशयातील पाणी उन्हाळ्यात संपले होते, तेव्हाच मासेही संपली होते. आता वाढलेल्या पाण्यामध्ये विविध जातीच्या माशांचे मत्स्यबीज सोडले तर जलाशयात मासे वाढतील. सध्या अथांग भरलेल्या जलाशयात मासेच नसल्याने मच्छीमारी करणे अवघड झाले आहे, त्यामुळे मच्छिमारी सोडून शेतमजुरीची कामे करावी लागत आहेत. 
- वीरसिंग नगरे, सीताराम पतुले, मच्छीमार, केत्तूर

 

तज्ज्ञ म्हणतात...

हा मासा उन्हाळ्यात पाणी कमी झालेल्या पात्रात कुठल्यातरी डोहात राहिला असल्यामुळे याची भरपूर वाढ झाली असेल. धरण भरल्यानंतर त्याच्या मुक्त विहारात अपघाताने तो मासेमारी करणाऱ्या जाळीत सापडला. जरी सध्या मासे अत्यल्प प्रमाणात सापडत असले तरी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे नजीकच्या काळात भरपूर मासे मिळतील. 
- डॉ. प्रा. अरविंद कुंभार, पशुपक्षी अभ्यासक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now ..! He did not hold the reservoir Adi Fish weighing 17 kg