आता माझं घर पण फाईव्ह स्टार; सांगली महापालिकेचा उपक्रम

घनशाम नवाथे 
Monday, 25 January 2021

फाईव्ह स्टार घर अर्थात माझे घर पंचतारांकित! आजपर्यंत सांगली-मिरज-कुपवाड महापालिका क्षेत्रातील 850 घरांना हा पंचतारांकित किताब मिळाला आहे. 

सांगली : जेवायला फाईव्ह स्टार हॉटेल पाहिजे, सारी लाईफस्टाईल फाईव्ह स्टार पाहिजे, मग आपलं स्वत:चं घर फाईव्ह स्टार का नको, असा सवाल आजपर्यंत कधीच कुणाला पडला नसेल, पण तो महापालिकेला मात्र पडला आणि त्यातून सुरू झाला एक अनोखा उपक्रम. फाईव्ह स्टार घर अर्थात माझे घर पंचतारांकित! आजपर्यंत सांगली-मिरज-कुपवाड महापालिका क्षेत्रातील 850 घरांना हा पंचतारांकित किताब मिळाला आहे. 

लोकसहभागाशिवाय कोणतीही योजना आणि उपक्रम यशस्वी होत नाही, पण हा लोकसहभागही सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी वेगवेगळ्या युक्‍त्या लढवाव्या लागतात. माणसाच्या बदललेल्या लाईफस्टाईलचा, त्यांच्या या मानसिकतेचाच उपयोग चांगल्या मोहिमेसाठी करून घेतला, तर असा विचार महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी केला आणि त्यातून ही पंचतारांकित घराची संकल्पना प्रत्यक्षात उतरली. 

याबाबत माहिती देताना महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र ताटे यांनी सांगितले, की स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा या मोहिमांना जरासे व्यापक करून हा पंचतारांकित घरांचा उपक्रम जानेवारी महिन्यापासून महापालिका क्षेत्रात सुरू करण्यात आला. महापालिकेच्या लिंकवरून कोणालाही या उपक्रमात सहभागी होता येते. पंचतारांकित घरांबाबत जे पाच निकष ठरवण्यात आले आहेत, ते पूर्ण केले आहेत की नाहीत, याची स्वतंत्र यंत्रणेच्या वतीने तपासणी करण्यात येते. फोटो घेण्यात येतात आणि मग हे निकष पूर्ण करणाऱ्या घराच्या दारावर पंचतारांकित घराचा सुंदर लोगो लावण्यात येतो. हा मान तर मिळतोच शिवाय असा पुरस्कार मिळालेल्या घरमालकांना घरपट्टीत चार टक्के सवलतीही देण्यात येते. आजपर्यंत महापालिका क्षेत्रातील 850 घरे पंचतारांकित झाली असून, मोहिमेला खूप मोठा प्रतिसाद मिळत आहे. 

पंचतारांकित घरासाठी पाच निकष

  • घरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची शास्त्रीय विल्हेवाट.
  • पाण्याचा जपून आणि पुनर्वापर.
  • विजेचा योग्य आणि अपारंपरिक ऊर्जास्त्रोतांचा वापर.
  •  प्राणी, पक्ष्यांसाठी निवारा. 5) वृक्षलागवड व संगोपन.

ही चळवळ लाईफस्टाईल व्हायला हवी

पंचतारांकित घरासाठी लागणारे दोन-तीन निकष काही प्रमाणात प्रत्येक घराने पूर्ण केलेले असतातच; पण आम्हाला हा उपक्रम फक्त पुरस्कारांपुरता मर्यादित ठेवायचा नाही. ही चळवळ लाईफस्टाईल व्हायला हवी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.'' 
- डॉ. रवींद्र ताटे (महापालिका आरोग्य अधिकारी) 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now my home also five star; An initiative of Sangli Municipal Corporation