आता आरक्षण हिसकावून घेण्याची वेळ : शंकरराव गडाख

सुनील गर्जे
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

आरक्षणाच्या मुद्द्यावर या तीनही समाजाने एकमेकांना पाठिंबा देत काढण्यात आलेल्या मोर्चाचा प्रारंभ नेवासे येथील इस्तेमा मैदानातून 'एका मराठा.. लाख मराठा.. बरोबरच सरकारविरोधी घोषणांनी मोर्चा तहसीलवर धडकला. माजी आमदार शंकरराव गडाख, विठ्ठल लंघे, भैय्यासाहेब देशमुख वगळता तालुक्यातील बहुतांशी नेत्यांनी मोर्चाकडे पाठ फिरवली.

नेवासे : मराठा, धनगर व मुस्लिम समाजाला आरक्षण या मागणीसह हुतात्म्यास श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज शुक्रवार (ता. 3) रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.

मोर्चात महिला, तरुणींसह विद्यार्थी-विद्यार्थिनींसह हजारो समाजबांधवांच्या मोठा सहभागी झाले होते. यावेळी भगवे, पिवळे व हिरवे झेंडे हातात असलेले शेकडो तरुणांच्या 'एका मराठा... लाख मराठा.. सह आरक्षण मिळालेच पाहिजे. या घोषणेने नेवासे शहर दणाणले होते. दरम्यान, मोर्चेकरी व पोलिसांचे समन्वयामुळे धडक मोर्चा असूनही यावेळी मोर्चात मोठी शिस्त पहायला मिळाली. 

आरक्षणाच्या मुद्द्यावर या तीनही समाजाने एकमेकांना पाठिंबा देत काढण्यात आलेल्या मोर्चाचा प्रारंभ नेवासे येथील इस्तेमा मैदानातून 'एका मराठा.. लाख मराठा.. बरोबरच सरकारविरोधी घोषणांनी मोर्चा तहसीलवर धडकला. माजी आमदार शंकरराव गडाख, विठ्ठल लंघे, भैय्यासाहेब देशमुख वगळता तालुक्यातील बहुतांशी नेत्यांनी मोर्चाकडे पाठ फिरवली. यावेळी तहसीलच्या मुख्य प्रवेशव्दारा शासनाच्या निषेध सभा झाली. सभेदरम्यान शंकरराव गडाख हे पाठीमागे मोर्चेकऱ्यात बसले होते. मात्र, आयोजकांनी अनेक वेळा विनंती करूनही ते समोर न आल्याने आयोजकांनी त्यांना आग्रह करत हाताला धरून समोर आणले.  

शंकरराव गडाख म्हणाले, "समाजासाठी आंदोलकांनी दिलेले बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. शासन मराठा, मुस्लिम, धनगर समाजाचा अंत पहात असून आता आरक्षण हिसकावून घेण्याची वेळ आली आहे. अरक्षणासाठी निर्णायक लढा लढावा लागणार आहे. सर्व समाज एकत्र आला ही क्रांतीची सुरवात नेवशातून झाली आहे आपण सर्वजण एकत्र आल्यावर सरकारला नक्की झुकावे लागेल.

यावेळी राष्ट्रवादीचे नेते विठ्ठल लंघे, आरपीआयचे प्रवक्ते अशोक गायकवाड, ऋषिराज टकले, स्वप्नांक्षा डिके, राणी दरंदले, सुमती घाडगे, महंमद आतर, अॅड. सादिक शिलेदार, गफूर बागवान, अशोक कोळेकर, वकील संघाचे अध्यक्ष अॅड. वसंत नवले, उपाध्यक्ष अॅड. गोकुळ भाताने यांची भाषणे झाली. यावेळी तहसीलदार उमेश पाटील यांनी मोर्चेकर्यांचे निवेदन स्विकारले. 

प्रास्ताविक भाऊसाहेब वाघ यांनी केले. यावेळी मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सूत्रसंचालन अनिल ताके, संदीप बेहळे यांनी केले तर आभार असिफ पठाण यांनी मानले.  

या आहेत मागण्या

मराठा आरक्षणाच्या प्रमुख मागणीसह, शेतकऱ्यांना सरसकट संपूर्ण कर्जमाफी द्यावी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबास 10 लाख रुपयांची मदत देऊन या कुटुंबातील एका सदस्यास शासकीय नोकरीत सामावून घ्या, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अमलबजावणी करा. 

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी पाच हजार कोटी रुपयांची तरतूद करावी, छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी निधी देऊन त्वरित काम सुरू करावे, छत्रपतींची जयंती 29 फेब्रुवारी या एकाच दिवशी साजरी करावी, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बलिदान देणाऱ्या व्यक्तींच्या कुटुंबियांना 50 लाखांची मदत द्या, मराठा आरक्षण प्रश्नी आंदोलनकर्त्यांवरील दाखल गुन्हे मागे घ्या या मागण्या मांडणात आल्या आहे.

150 पोलिसांचा बंदोबस्त   

मोर्चाचे नियोजन व होणारी गर्दी लक्षात घेऊन उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे, नेवाशाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे यांच्या नेतृत्वाखाली चार पोलिस निरीक्षक, दोन सहाय्यक पोलिस निरीक्षक व १५० पोलिस कर्मचारी असा नेवाशात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

Web Title: Now the time to grab the reservation says Shankarrao Gadakh