नृसिंहवाडी मंदिरासमोर नदीपात्र कोरडे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

नृसिंहवाडी - येथील दत्त मंदिरासमोरील कृष्णेचे पात्र यंदा मार्चपूर्वीच कोरडे पडले आहे. पंचगंगेपाठोपाठ कृष्णेचीही गटारगंगा झाली असून लोकप्रतिनिधी, आरोग्य विभाग व प्रदूषण नियंत्रण मंडळाने याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. पात्र कमी झाल्यामुळे औरवाडच्या काठावर मासेमारीस उधाण आले असून नदीपात्राशेजारी (औरवाड) कचऱ्याचे साम्राज्य आहे.

नृसिंहवाडी - येथील दत्त मंदिरासमोरील कृष्णेचे पात्र यंदा मार्चपूर्वीच कोरडे पडले आहे. पंचगंगेपाठोपाठ कृष्णेचीही गटारगंगा झाली असून लोकप्रतिनिधी, आरोग्य विभाग व प्रदूषण नियंत्रण मंडळाने याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. पात्र कमी झाल्यामुळे औरवाडच्या काठावर मासेमारीस उधाण आले असून नदीपात्राशेजारी (औरवाड) कचऱ्याचे साम्राज्य आहे.

कोल्हापुरातील काही नाले तसेच इचलकरंजीतील प्रोसेसमधील सांडपाणी थेट नदीत सोडल्याने पंचगंगा गटारगंगा बनली. आता कृष्णा नदीचाही प्रदूषणामुळे श्‍वास गुदमरू लागला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने वास्तविक प्रोसेस कारखान्यांवर कारवाई करणे गरजेचे होते. मात्र "अर्थपूर्ण' बाबीमुळे ही गोष्ट मागे पडते.

प्रदूषणामुळे तेरवाड बंधाऱ्यावर अनेक मृत माशांची जलसंपत्ती संपुष्टात येत आहे. प्रदूषण नियंत्रण विभाग व शिरोळ आरोग्य विभाग नाममात्र कधीतरी पाण्याचे नमुने घेऊन अहवाल तयार करण्यात व्यस्त आहेत. आरोग्य विभागाने दैनंदिन पाण्याचे नमुने घेणे, प्रयोगशाळेमध्ये तपासणी करणे व संबंधित गावाला पाणी शुद्धीकरणाचा जागर देणे हे कार्य त्यांचे आहे. मात्र, कार्यशून्य विभागाने पाण्यासाठी कधी प्रबोधन केले हे ऐकिवात नाही.

येथे दत्त मंदिरासमोर पात्र कोरडे पडले असून जिल्हाधिकारी यांची बंदी असताना मंदिरासमोर वाळू उपसा व मासेमारीस उधाण आले आहे. रात्री चोरट्या वाळू उपशामुळे नदीत खोलगट भाग बनला आहे. मासेमारीमुळे कमालीचे कचरा, प्लास्टिक यांचे साम्राज्य वाढत असून पाण्याचा शुद्धिकरणाचा प्रश्‍न गंभीर बनला आहे.

- औरवाडमधील सांडपाणी थेट नदीत
- नृसिंहवाडीचा प्रदूषणास हातभार
- प्रशासन नाचवतेय कागदी घोडे
- चोरट्या वाळू उपशामुळे खड्डे
- सात गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न गंभीर

पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर
प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रोसेस कारखान्यावर कारवाई केल्याचे दिसत नाही. लोकप्रतिनिधींचे निधीसाठी प्रयत्न तोकडे पडत आहेत. सांडपाणी शुद्धिकरण प्रकल्पांची उभारणी दिसत नाही. दूषित पाण्यामुळे नृसिंहवाडी, औरवाड, कुरुंदवाडसह अकिवाट, तेरवाड, हेरवाड, अब्दुललाट शिरोळच्या अनेक भागांत आरोग्याचा प्रश्‍न गंभीर बनत चालला आहे.

Web Title: Nrsinhavadi temple basin dry