'न्यासा'च्या संचालिका साधना गांगण यांचा 'कॉफी विथ सकाळ'मध्ये संवाद 

परशुराम कोकणे
रविवार, 3 मार्च 2019

म्युझिकल हिलिंगच्या माध्यमातून आपण कोणालाही कर्मकांड सांगत नाही. आपण माणूस आहोत याची जाणीव करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत, असे न्यासा संस्थेच्या प्रमुख, गायिका साधना गांगण यांनी 'कॉफी विथ सकाळ' उपक्रमात सांगितले. 

सोलापूर : स्वत: आनंदी राहणे आणि इतरांना आनंद देणे यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत. म्युझिकल हिलिंग हा आनंद शोधाचा उत्तम उपाय आहे. 'न्यासा'च्या माध्यमातून आजवर हजारो लोकांना आनंद मिळविण्याचा मार्ग दाखविण्यात यश आले आहे. म्युझिकल हिलिंगच्या माध्यमातून आपण कोणालाही कर्मकांड सांगत नाही. आपण माणूस आहोत याची जाणीव करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत, असे न्यासा संस्थेच्या प्रमुख, गायिका साधना गांगण यांनी 'कॉफी विथ सकाळ' उपक्रमात सांगितले. 

म्युझिकल हिलिंग कार्यक्रमाच्या माध्यमातून आजवर खूप चांगले अनुभव समोर आले आहेत, असे सांगून साधना गांगण म्हणाल्या, "मी 18 वर्षे यूकेमध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत होते. तेथून परत आल्यानंतर मी भारतात राहण्याचा निर्णय घेतला. नोकरी करणाऱ्यांचा तणाव काय असतो हे मला जाणवले. लग्नानंतर काही दिवसांतच आई-वडिलांचा अपघात झाला. त्या घटनेतून मला स्वत:ची ताकद दिसून आली. गाणे आणि संगीतामुळे मी कधीच थकले नाही हे मला लक्षात आले. मग मी विपश्‍यना केली. हैदराबाद येथे जाऊन स्पीरीच्युअलचे प्रशिक्षण घेतले. सत्यम्‌ शिवम्‌ सुंदरम्‌... हे मी तिथे गायले. अनेक मान्यवर तिथे होते. माझ्या गाण्यामुळे, आवाजामुळे, हिलिंग एनर्जीमुळे सर्वांमध्ये उत्साह संचारला होता. त्या एका गाण्याने माझे आयुष्य बदलून टाकले. तेथून आल्यावर मी नाद ध्यान योगिनी म्हणून कामाला सुरवात केली. अनेक सीडी बाजारात आणल्या.'' 

"ज्येष्ठ कवी किशोर दीक्षित यांच्याशी भेट झाली. त्यानंतर मी कविता लिहायला लागले. मीरेची भजने मी गायले. जादूच्या गतीने मी चाली लावल्या आहेत. मला जो परमेश्‍वर दिसला आहे, जो कळला आहे तो इतरांनाही समाजावा, दिसावा यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन करून आपण हा कार्यक्रम करीत आहोत.'' 

नोकरी, व्यवसायात स्पर्धा इतकी वाढली आहे माणूस आनंद विसरून गेला आहे. आयुष्यात नात्यांना महत्त्व आहे. म्युझिकल हिलिंगच्या माध्यमातून कौटुंबिक जिव्हाळा वाढवण्यात आम्हाला यश येत असल्याचेही साधना गांगण यांनी सांगितले. फार वर्षांपूर्वी मी सिद्धिविनायकाच्या मंदिरात जायचे. तिथे ज्येष्ठ गायनांचे कार्यक्रम चालू असायचे. तेव्हा मी विचारही केला नव्हता की एखाद्या दिवशी तिथे माझाही कार्यक्रम होईल, अशी आठवणही त्यांनी सांगितली. 

प्रत्येकाने आय लव माय सेल्फ... हे रोज म्हणावे असे म्हटल्याने चेहऱ्यावर नक्कीच आनंद येईल असा सल्ला देऊन साधना गांगण म्हणाल्या, माझी दारू सुटली, मला छान झोप लागते, मी लवकर उठतो, मी आनंदी आहे असे अनेक अनुभव माझ्यासमोर येत असतात. आता फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात स्पीरिच्युअल सायंटिस्ट या विषयावर अभ्यास केला जात आहे. आपल्या परंपरांबद्दल आपल्यापेक्षा परदेशातील लोकांना अधिक माहिती आहे. परदेशात यावर सातत्याने अभ्यास होत आहे. प्रशिक्षणही उपलब्ध आहेत. लोकांना आनंदी करण्यासाठी, आनंदी ठेवण्यासाठी न्यासा कार्यरत आहे. ज्ञान आणि साधना हा न्यासाचे अर्थ आहे. 'सा' हा पहिला स्वर आहे. संगीतकार आधी सा शोधत असतो. तसेच प्रत्येकाला सा देण्यासाठी आम्हाला यश येत आहे. 

आपल्याला उत्स्फूर्त जगता येतं का याचा प्रत्येकाने विचार करावा. आपण जगतोय का? आपण माणूस आहोत की रोबोट आहोत हे प्रत्येकाने स्वत:ला विचारावे असे सांगताना आपण माणूस आहोत याची प्रत्येकाला जाणीव करून देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. म्युझिकल हिलिंग कार्यक्रमात आपण संस्कृत भाषेतील स्रोत, मंत्र म्हणतो. कर्मकांडावर भर न देता जे ज्ञान वेदांमध्ये आहे ते आपण सर्वांना सांगतो. आपल्या थेरेपीचे मूळ स्वत:वर प्रेम करणे हेच आहे. 

पूर्वी प्रेम दाखविले जात नव्हते, आता डे साजरे करून प्रेम दाखवावे लागतात. आपण डे साजरा करून आपली संस्कृती विसरल्याचे दाखवून देत आहोत. एका कार्यक्रमावेळी एका महिलेने मला विद्यार्थ्यांसाठी काम करण्याचे सुचविले. मुलांच्या समस्या मी जाणून घेतल्या. तेव्हापासून आम्ही मुलांसाठीही काम करत आहोत. ही अनुभूती सोलापूरकरांना यावी म्हणून आपण हा उपक्रम सोलापुरात करणार आहोत. आपल्याला कोणत्याही धर्माचा प्रचार करायचा नाही. लोकांना आनंद द्यायचा आहे. 
 
साधना गांगण म्हणाल्या... 
- आयुष्यामध्ये कॉपी पेस्ट करू नको. 
- आपल्याला आनंद देतो तोच खरा धर्म. 
- आनंदासाठी सर्वतोपरी प्रयत्न आवश्‍यक आहेत. 
- हरवलेला आनंद शोधण्यासाठी हिलिंगचा उपाय. 
- आपल्याला कोणी चांगले म्हटले नाही म्हणून नाराज होऊ नका. 
- तुम्हाला जी कला आवडते ती जोपासा. 
- वेळ काढून चांगल्या गोष्टींना सुरवात करा. 
- पूजा आणि कलेमध्ये काहीही फरक नाही. 
- जी गोष्ट निरपेक्ष भावनेने केली जाते ती फुलते. 

या स्पर्धात्मक युगात तुमची सृजनशक्ती तुम्ही किती वापरताय हे महत्त्वाचे आहे. जोवर तुम्ही आनंदात राहणार नाही तोवर तुम्हाला नवीन गोष्टी सुचणार नाहीत. तुम्ही स्वत:वर प्रेम कराल तेव्हांच इतरांवर प्रेम करू शकाल. आनंद मिळविण्यासाठी प्रत्येकाने स्वत:शी जोडले जाणे गरजेचे आहे. म्युझिकल हिलिंग त्यासाठी उत्तम मार्ग आहे. ही अनुभूती आता सोलापूरकरांनाही येणार आहे. 
- साधना गांगण, संचालिका, न्यासा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nyasa director Sadhna Gangan dialogues with Coffee with Sakal