सोलापूर - शिक्षणाधिकाऱ्यांविना कार्यालय पोरके

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जुलै 2018

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी सूर्यकांत पाटील हे "असून अडचण, नसून खोळंबा' ठरत आहेत. गेल्या दीड महिन्यांपासून त्यांच्याकडे पदभार आहे. मात्र, त्या कालावधीत बोटावर मोजण्याइतकेच दिवस ते कार्यालयात थांबले आहेत. त्यांच्याविना कार्यालय पोरके झाल्याचे चित्र मागील काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे.

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी सूर्यकांत पाटील हे "असून अडचण, नसून खोळंबा' ठरत आहेत. गेल्या दीड महिन्यांपासून त्यांच्याकडे पदभार आहे. मात्र, त्या कालावधीत बोटावर मोजण्याइतकेच दिवस ते कार्यालयात थांबले आहेत. त्यांच्याविना कार्यालय पोरके झाल्याचे चित्र मागील काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे.

तत्कालीन शिक्षणाधिकारी सत्यवान सोनवणे यांच्याबद्दल तक्रारी आल्यानंतर त्यांची बदली करण्याची शिफारस जिल्हा परिषदेने केली होती. सोनवणे यांची बदली झाल्यानंतर त्यांचा पदभार निरंतरचे शिक्षणाधिकारी सूर्यकांत पाटील यांच्याकडे देण्यात आला. पदभार दिल्यापासून ते कार्यालयात क्वचितच बसले. पाटील हे कार्यालयात बसत नसल्यामुळे शाळांचे व शिक्षकांचे प्रश्‍न प्रलंबित राहिले आहेत. जिल्ह्यातील माध्यमिकच्या शिक्षकांच्या पगाराचा विषयही त्यामुळे प्रलंबित राहात आहे.

शिक्षणाधिकाऱ्यांच्या भेटीसाठी जिल्ह्याच्या टोकाहून आलेले मुख्याध्यापक शिक्षणाधिकारी कार्यालयात नसल्यामुळे निराश होऊन परत जात आहेत. जिल्ह्यात अनेक मोठ्या शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत. त्यांची काही ना काही कामे नेहमीच शिक्षण विभागात असतात. मात्र, शिक्षणाधिकारीच जागेवर नसल्यामुळे त्यांचीही कामे प्रलंबित राहिली आहेत. शिक्षण विभागात असलेल्या इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांवरही पाटील यांचा विश्‍वास नसल्याचे बोलले जाते.

नागपूर येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये पाटील यांच्याविषयीच्या अनेक तक्रारी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे
गेल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने ते कार्यालयातच थांबत नसल्याच्या
तक्रारीचा समावेश आहे. जिल्हा भौगोलिकदृष्ट्या मोठा असल्यामुळे माध्यमिक शिक्षण विभागात कामाचा प्रचंड व्याप आहे. अशातच शिक्षणाधिकारी कार्यालयात थांबत नसल्याने इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठी अडचण होते.

जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या मुख्याध्यापक व शिक्षकांना त्यांना
तोंड द्यावे लागते. त्यामुळे तत्कालीन शिक्षणाधिकारी सोनवणे हेच
बरे असे म्हणण्याची वेळ जिल्ह्यातील शिक्षकांवर आली आहे. दरम्यान, याबाबत पाटील यांच्याशी सव्वापाचच्या सुमारास संपर्क करण्याचा प्रयत्न
केला असता त्यांचा फोन लागला नाही.

"सीईओं'नी लक्ष देण्याची गरज
शिक्षणाधिकाऱ्यांच्या या गैरहजेरीबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी
अधिकाऱ्यांनी योग्य तो निर्णय घेणे गरजेचे आहे. जेणेकरून शिक्षकांच्या
प्रश्‍नांची सोडवणूक करता येईल.

Web Title: office is incomplete without Education Officer in solapur