अरे बाप रे...! महापालिका अधिकाऱ्यांच्या ग्रुपवर "पॉर्न व्हिडीओ' 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

चार वर्षांपूर्वीही झाला होता असा "प्रकार' 
चार वर्षांपूर्वी महिला कर्मचाऱ्याच्या संगणकावर अश्‍लिल छायाचित्रे पाठविण्यात आल्याचा प्रकार 17 जानेवारी 2015 रोजी उघडकीस आला. हा प्रकारही दडपण्याचा प्रयत्न झाला, मात्र नगरसेवक बाबा मिस्त्री यांच्या पाठपुराव्यामुळे तत्कालीन सहायक आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले. विशाखा समितीची बैठकही झाली. सौ. दगडे-पाटील यांच्या बदलीनंतरही या प्रकरणी समितीच्या बैठका झाल्या आणि "व्हायरस'ची अडचण आणि "सायबर' विभागाचा अहवाल उपस्थित करीत संबंधित कर्मचाऱ्यास "क्‍लिन चिट' देण्यात आली. 

सोलापूर : स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरु असलेल्या सोलापूरचे भवितव्य ज्या अधिकाऱ्यांच्या हाती आहे, त्याच अधिकाऱ्यांच्या "एसएमसी ऑफिसिअल' या व्हॉटस्‌अप ग्रुप वर "पॉर्न व्हिडीओं'चा धिंगाणा सुरु असल्याचे दिसून आले. या ग्रुपवर खानदानी आणि सुसंस्कृत घराण्यातील महिला अधिकारीही आहेत. त्यामुळे हे प्रकरण दडपण्याचे प्रयत्न सुरु आहेत. 

 

अरे वा.. तर सोलापुरात होऊ शकतो महाशिवआघाडीचा महापौर

 

महापालिकेच्या कामकाजासंदर्भात काही सूचना करायची असल्यास ते सोईचे व्हावे, वर्तमानपत्रामध्ये आलेल्या बातम्यांची दखल घेऊन संबंधितांनी योग्य ती कारवाई करावी या संदर्भातले आदेश तत्पर पोचावेत यासाठी महापालिका आयुक्तांसह सर्व अधिकारी, खातेप्रमुख आणि विशेष नियुक्ती केलेल्या कर्मचाऱ्यांचा हा ग्रुप आहे. त्या ग्रुपवर हे व्हिडीओ ग्रुपवरील एका सदस्याकडून रात्रीच्या वेळी अपलोड झाले. हा प्रकार ध्यानात आल्यावर ग्रुपवरील सर्वांचीच विशेषतः महिला अधिकाऱ्यांची झोप उडाली. अनेकांनी या प्रकाराबद्दल नापसंती व्यक्त केली, तर काहीजणांनी ग्रुपमधून लेफ्ट होणे पसंद केले. दरम्यान, या प्रकरणाची वाच्यता होऊ नये यासाठी ग्रुपमधील बहुतांश सदस्यांना "रिमुव्ह' करण्यात आले. हा प्रकार बाहेर कोणालाही कळणार नाही याची पूरेपर दक्षता घेण्यात आली. 

 

राष्ट्रपती राजवट या महापालिकेसाठी आपत्ती

 

हा प्रकार ग्रुपवर असलेल्या आयुक्तांपासून कर्तव्यकठोर अधिकाऱ्यांना माहिती आहे. मात्र तरीही त्याची वाच्यता होऊ नये यासाठी धडपड सुरु आहे. आयुक्त दीपक तावरे प्रशिक्षणासाठी दौऱ्यावर गेले आहेत. त्यामुळे प्रभारी आयुक्ताचा पदभार जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे आहे. महापालिका सभेत डॉ. भोसले यांनी नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्‍नांना दिलेली उत्तरे ऐकून प्रत्येकजण प्रभावित झाला आहे. त्यामुळे ते या प्रकरणाची गंभीर दखल घेतील आणि "भ्रष्टाचारी व कामचुकारांना पाठिशी घालणारी महापालिका' हा गैरसमज ते दूर करतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यास कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. उद्या (शुक्रवारी) संबंधित अधिकारी त्याचे म्हणणे सादर करेल. त्यानंतर पुढील धोरण ठरविण्यात येईल. 
- अजयसिंह पवार, उपायुक्त, सोलापूर महापालिका 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Oh my god "Porn Video" on Group of Municipal Officers