जुन्या कोयना पुलासाठी जुनाच माल!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 डिसेंबर 2018

कऱ्हाड - येथील ब्रिटिशकालीन जुन्या कोयना पुलाचे काम तब्बल सव्वाशे वर्षांनंतर सुरू झाले आहे. मात्र, तेही धीम्या गतीने सुरू असल्याने दुचाकीस्वारांसह विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन पुणे- बंगळूर महामार्गावरून प्रवास करावा लागत आहे. या कामांसाठी फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढवून दिली आहे. मात्र, अजूनही सहा महिने काम पूर्ण होण्यास लागतील, असे कामगारांचे म्हणणे आहे. पुलावरील नऊ लोखंडी प्लेटांच्या लाइनपैकी फक्त तीनच लाइनला नव्या प्लेटा टाकण्यात आल्या आहेत. उर्वरित सहा लाइनला जुन्याच लोखंडी प्लेटा वापरल्या आहेत. त्यामुळे आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

दळणवळणाच्या साधनांसाठी ब्रिटिशांनी येथील कोयना नदीवर लोखंडी पूल बांधला. त्याला सव्वाशे वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. त्यानंतर सध्या या पुलाच्या कामासाठी निधीची उपलब्धता झाल्याने मुहूर्त मिळाला आहे.

पहिल्या टप्यात माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार बाळासाहेब पाटील यांनी त्या कामाची पाहणी केली. ते काम पहिल्या टप्प्यात गतीने सुरू होते. मात्र, त्यानंतर गेल्या सहा ते सात महिन्यांपासून हे काम धीम्या गतीने सुरू आहे. त्याकडे कोणाचेच लक्ष नसल्याची स्थिती झाली आहे. त्यामुळे या कामासाठी बांधकाम विभागाला ठेकेदाराला मुदतवाढ द्यावी लागली. त्यानुसार फेब्रुवारीपर्यंत या कामासाठी मुदतवाढ देण्यात आल्याचे बांधकाम विभागाने सांगितले. सध्या तेथील लोखंडी प्लेटांच्या जोडणीचे काम सुरू आहे. मात्र, त्यासाठी फक्त तीन ते चारच कामगार तेथे आहेत. त्यांनी अजूनही हे काम पूर्ण होण्यासाठी सहा महिन्यांहून अधिक काळ लागेल, असे सांगितले. त्यामुळे मुदतीत काम पूर्ण होण्याबाबत साशंकताच आहे. परिणामी दुचाकीस्वार, महिला, विद्यार्थ्यांना पुणे- बंगळूर महामार्ग ओलांडून जीव धोक्‍यात घालून जावे लागत आहे. बांधकाम विभागाने याचा विचार करून तातडीने काम मार्गी लावावे, अशी मागणी होत आहे.

कामाकडे सर्वांचेच दुर्लक्ष
जुन्या कोयना पुलाच्या कामाकडे अलीकडच्या काळात लोकप्रतिनिधींसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही या कामाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारांना विचारणारेच कोणी नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे काम धीम्या गतीने सुरू आहे. त्याचा फटका वाहनधारक व विद्यार्थ्यांना बसत आहे. 

Web Title: Old Koyana Bridge Old Material Use