चंदूरमध्ये खासगी उमेदवार ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

चंदूरमध्ये खासगी उमेदवार ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

इचलकरंजी - सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी नऊ हजारांची लाच घेताना खासगी उमेदवाराला (एजंट) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. चंदूर (ता. हातकणंगले) तलाठी कार्यालयासमोर कारवाई करण्यात आली. सुधीर दत्ता पाटील (वय ४४, रा. सुतार गल्ली, चंदूर) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. 

चंदूर येथील जमीन गट क्रमांक ४०५ मधील अर्धा गुंठा जमीन तक्रारदाराने सन १९८८ मध्ये खरेदी केली. त्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर तक्रारदाराचे नाव लावून सातबारा मिळण्यासाठी तलाठी कार्यालयात वर्षापूर्वी अर्ज केला होता. त्यासाठी कागदपत्रे जोडली होती. त्यांना सातबारा मिळाला नाही. त्यांनी तलाठी चौगुले यांची भेट घेतली. त्यावेळी खासगी उमेदवार सुधीर पाटील भेटला. सातबारा उतारा तलाठी चौगुले यांच्या सहीशिक्‍यानिशी पाहिजे असल्यास १५ हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगून तक्रारदाराकडून पाच हजार रुपये घेतले. उर्वरित १० हजार रुपये सातबारा उतारा दिल्यानंतर देण्यास सांगितले.

यानंतरही तक्रारदारास सही शिक्‍क्‍याचा सातबारा उतारा मिळाला नाही. तक्रारदाराने तलाठी चौगुले व खासगी उमेदवार सुधीर पाटीलची भेट घेतली. उर्वरित १० हजार रुपये देण्याची मागणी पाटीलने केली. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे पाटील (चिकाम) व तलाठी चौगुलेविरोधात तक्रार दिली.

तक्रारीनुसार आज सकाळी बसवेश्‍वर कार्यालयासमोर शासकीय पंचाच्या समक्षाने लाचेच्या मागणीची पडताळणी पथकाने केली. यामध्ये पाटीलने तक्रारदाराकडून तडजोडीअंती नऊ हजार रुपये लाचेची मागणी केली. ही रक्कम तलाठी कार्यालयात घेऊन येण्यास सांगितले. त्यानुसार पथकाने सापळा रचून पाटील याला नऊ हजारांची लाच घेताना तलाठी कार्यालयासमोर पकडले. याप्रकरणी तलाठी चौगुलेचीही चौकशी होण्याची शक्‍यता आहे.
पोलिस निरीक्षक प्रवीण पाटील, सहायक फौजदार शामसुंदर बुचडे, पोलिस नाईक शरद पोरे, नवनाथ कदम, रूपेश माने, सुरेश अपराध यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com