कऱ्हाड आरोग्य विभागाच्या पुढाकाराने 'एक जन्म एक वृक्ष' मोहिम

हेमंत पवार
रविवार, 24 जून 2018

ज्या कुटुंबात बाळाचा जन्म होईल त्या कुटुंबाच्यावतीने एक झाड लावुन जगवायचे अशी ही संकल्पना असुन राज्यातील प्रत्येक गावात आरोग्य विभागाच्यावतीने आशा स्वयंसेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने ही मोहिम राबवण्यात येणार आहे.

कऱ्हाड - पर्यावरणाचा ढासळत चाललेला समतोल सावरुन वृक्षारोपण चळवळ घराघरापर्यंत पोचवण्यासाठी आरोग्य विभागाच्या पुढाकाराने 'एक जन्म एक वृक्ष' मोहिम राबवण्यात येणार आहे. ज्या कुटुंबात बाळाचा जन्म होईल त्या कुटुंबाच्यावतीने एक झाड लावुन जगवायचे अशी ही संकल्पना असुन राज्यातील प्रत्येक गावात आरोग्य विभागाच्यावतीने आशा स्वयंसेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने ही मोहिम राबवण्यात येणार आहे. राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमार्फत ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाची साखळी बिघडत चालली आहे. त्यामुळे ग्लोबल वार्मिंगचा मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सध्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तो धोका टाळण्यासाठी वृक्षारोपण काळाची गरज आहे, असे समजुन तो संदेश राज्यातील प्रत्येक गावातील घरांघरात पोचावा आणि त्यातून वृक्षारोपणाची चांगली चळवळ उभी रहावे यासाठी आरोग्य विभागाने हे एक जन्म एक वृक्ष या मोहिमेचा श्रीगणेशा केला आहे. त्याअंतर्गत ज्या कुटुंबात बाळाचा जन्म होईल त्या कुटुंबातील सदस्यांकडून आरोग्य विभागाच्या आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी यांच्या सहकार्याने त्या बाळाच्या नावाने एक झाड लावण्यात येईल. त्यासाठी ज्या कुटुंबातील महिलेची प्रसुती होणार आहे, त्या कुटुंबीयांनी जन्माला येणाऱ्या बाळाची आठवण म्हणून झाड लावावे अशी संकल्पना असून त्यासाठी आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी संबंधितांमध्ये झाड लावण्यासंदर्भात जनजागृती करणार आहेत. त्याचबरोबर संबंधित झाड जगवण्यासह त्या झाडाचा सांभाळ करण्याबाबतही संबंधित कुटुंबातील सर्वांना कर्मचाऱ्यांकडून प्रोत्साहीत करण्यात येणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायती व अन्य ठिकाणाहून रोपे उपलब्ध करण्यात येणार आहेत. ज्या कुटुंबाच्या घराच्या परिसरात जागा आहे तेथे किंवा त्या कुटुंबाच्या सल्याने उपलब्ध जागेवर वृक्षारोपण करण्यात येणार आहे. 

  • बाळाचा व झाडाचाही वाढदिवस 

अनेकदा दरवर्षी वृक्षारोपण केले जाते. मात्र त्यातील झाडे जगतातच असे नाही. त्यामुळे या मोहिमेअंतर्गत बाळाच्या जन्माच्या निमीत्ताने कुटुंबाकडून लावण्यात येणाऱ्या झाडाचा आणि बाळाचा वाढदिवस एकाच दिवशी साजरा करावा, अशीही संकल्पना या मोहिमेत आहे. त्यामागे झाडाची वाढ चांगली होवुन ती जगावे ही संकल्पना आहे. त्यामुळे झाडाचाही वाढदिवस साजरा करावा, असे सुचीत करण्यात आले आहे. 

  • आशा स्वयंसेविकांचा सन्मान 

राज्यात एक जन्म एक वृक्ष मोहिम आशा स्वयंसेविकांच्या पुढाकाराने आणि सहकार्याने राबवण्यात येणार आहे. त्यांनी चांगल्या पध्दतीने काम करावे यासाठी ज्या आशा स्वयंसेवकेच्या गावात लागवड केलेल्या वृक्षापैकी सर्वाधिक वृक्ष जगले असतील त्या आशा स्वयंसेविकेचा प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय आरोग्य विभागाच्यावतीने सन्मान करण्यात येणार आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: One Birth One Tree campaign led by the Karhad Department of Health