कांदा अनुदानाचे 114 कोटी मिळाले 

तात्या लांडगे 
रविवार, 17 फेब्रुवारी 2019

15 ते 31 डिसेंबर या कालावधीत कांदा विकलेल्या शेतकऱ्यांनी 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज केले. आता 31 जानेवारीपर्यंत कांदा विकलेल्या शेतकऱ्यांना 22 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे.

सोलापूर : राज्यातील एक लाख 60 हजार शेतकऱ्यांसाठी कांदा अनुदानाचे 114 कोटी 80 लाख रुपये राज्य सरकारने शनिवारी पणन विभागाला वर्ग केले आहेत. आता ही रक्‍कम गुरुवार, 21 फेब्रुवारीपासून शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा होणार असल्याची माहिती पणन विभागाने दिली. 

1 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत राज्यातील 71 बाजार समित्यांत पाच लाख 70 हजार शेतकऱ्यांनी कमी किमतीने कांदा विकला. परंतु, कागदपत्रे अपूर्ण असल्याने त्यापैकी तब्बल चार लाख शेतकरी अपात्र ठरले. त्यानंतर 15 ते 31 डिसेंबर या कालावधीत कांदा विकलेल्या शेतकऱ्यांनी 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज केले. आता 31 जानेवारीपर्यंत कांदा विकलेल्या शेतकऱ्यांना 22 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत कांदा विकलेल्या शेतकऱ्यांना उत्पन्नापेक्षा खूपच कमी रक्‍कम पदरात पडली. मात्र, शेतकऱ्यांच्या सात-बारा उताऱ्यावर पीकपेऱ्याची नोंद नसल्याचा भुर्दंड बळीराजाला सोसावा लागतोय. दुष्काळात रब्बी व खरीप वाया गेलेल्या शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात चार पैसे पदरात पडतील, अशी आशा अद्यापही आहे. 

  • अपात्र शेतकऱ्यांबाबत निर्णय नाही -

कमी किमतीने बाजार समित्यांत कांदा विक्री करूनही कागदपत्रे अपूर्ण असल्याने राज्यातील सुमारे चार लाख शेतकरी कांदा अनुदानासाठी अपात्र ठरले आहेत. त्यानंतर आता 15 डिसेंबर ते 31 जानेवारी या कालावधीत कांदा विकलेल्या एक-दीड लाख शेतकऱ्यांचा त्यात नव्याने समावेश होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांची मागणी असताना सरकारकडून काहीच निर्णय घेण्यात आलेला नाही. अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून अद्यापही अनुदानाची आशा आहे.

Web Title: one hundred fourteen crore onion subsidy received to maharashtra farmers