अबब ! मटक्‍यातून जमवली एक हजार कोटींची प्रॉपर्टी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

या सर्वांची सुमारे १५ खाती गोठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यातील सम्राट कोराणे आणि सावला यांनी गोव्यामध्येही कॅसिनोच्या रूपाने आपली मालमत्ता केली आहे. ही मालमत्ता मटक्‍याच्या व्यवसायातूनच उभी राहिल्याने ती जप्त करावी, अशी मागणी पोलिसांनी न्यायालयात केली

कोल्हापूर - प्रकाश ऊर्फ पप्पू सावला, सलिम मुल्ला, सम्राट कोराणे, अग्रवाल बंधू आणि झाकिर मिरजकर यांच्यावर मटकाअंतर्गत कारवाई करण्यात आली. या तपासात पोलिसांनी या सर्वांचे आर्थिक व्यवहार आणि संपत्तीची माहिती घेतली. या सर्वांनी मटक्‍याच्या जोरावर एक हजार कोटींची मालमत्ता जमवली असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

या सर्वांची सुमारे १५ खाती गोठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यातील सम्राट कोराणे आणि सावला यांनी गोव्यामध्येही कॅसिनोच्या रूपाने आपली मालमत्ता केली आहे. ही मालमत्ता मटक्‍याच्या व्यवसायातूनच उभी राहिल्याने ती जप्त करावी, अशी मागणी पोलिसांनी न्यायालयात केली असल्याने लवकरच या सर्वांच्या मालमत्तेवर टाच येणार, हे आता निश्‍चित झाले आहे. 
मटक्‍याने केवळ समाजव्यवस्थाच नव्हे तर कायदासुव्यवस्थाही पोखरली आहे. कोल्हापुरात तर मटका एवढा फोफावला आहे की मटका घेणारे दिवसेंदिवस गब्बर बनले आहेत. त्यांच्याकडे या व्यवसायातून एवढी माया गोळा झाली की त्यांनी कोल्हापूरच्या सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेतही शिरकाव केला.

हेही वाचा - मुरगुडचे सहायक पोलिस निरीक्षक तडकाफडकी निलंबित; कारण काय वाचा

सर्वांचे आर्थिक व्यवहार पोलिसांच्या रडारावर

गणपती असो की नवरात्री उत्सव त्यांची आर्थिक मदत काही जणांना हक्काची वाटू लागली. त्यांनी दिलेल्या देणग्या, वर्गणी हे सर्व पाहून यांच्याकडे नेमके पैसे आहेत तरी किती, असा प्रश्‍न सर्वसामान्य माणसाला पडायचा. जशी पोलिसांनी या मटका घेणाऱ्यांवर मोकाअंतर्गत कारवाई केली, तसे या सर्वांचे आर्थिक व्यवहार पोलिसांच्या रडारावर आले. तपासात निष्पन्न झालेले संपत्तीचे आकडे सर्वसामान्य माणसाला अचंबित करायला लावणारी आहे.

हेही वाचा - धक्कादायक ! कळंबा कारागृहात सापडला मोबाईल 

वेगवेगळ्या उद्योगतही गुंतवणूक

सावला, मुल्ला, कोराणे, अग्रवाल आणि मिरजकर या सर्वांची मिळून असणारी मालमत्ता सुमारे १ हजार कोटी रुपयांची आहे. यातील नऊशे कोटींची मालमत्ता मुंबई आणि परिसरात असून, उर्वरित मालमत्ता कोल्हापूर, सांगली, गोवा या ठिकाणी आहे. ही मालमत्ता स्थावर आणि जंगम या दोन्ही स्वरूपात आहे. यामध्ये फ्लॅट, जमिनी, हॉटेल, कॅसिनो यांचा समावेश आहे. वेगवेगळ्या उद्योगतही यांनी गुंतवणूक केली असल्याची दाट शक्‍यता असून, त्याचा पोलिस तपास करत आहेत. ही सर्व मालमत्ता मटक्‍याच्या व्यवसायातूनच मिळवल्याने ती जप्त करण्यात यावी, अशी मागणी पोलिसांनी न्यायालयात केली आहे. तसेच या सर्वांची मिळून १५ बॅंक खाती गोठवण्याची प्रक्रिया सुरू आहे.  

कायदेशीर प्रयत्न सुरू

आमच्याकडे पैसे आहेत म्हणजे आम्ही काही करू शकतो, अशी मानसिकता मटकेवाल्यांची झाली होती; मात्र मोका कारवाईमुळे त्यांना कायद्याची ताकद लक्षात आली असावी. त्यांच्या संपत्तीचे मूल्यमापन सुरू असून, ती जप्त करण्यात येण्यासाठी कायदेशीर प्रयत्न सुरू आहेत. 
- डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा पोलिस अधीक्षक. 

ॲड. उपाध्येंची सनद रद्द करा 

तेलनाडे बंधूंच्या अवैध व्यवसायात सहभागी असल्याच्या आरोपावरून ॲड. पवनकुमार उपाध्ये यांच्यावर मोकाअंतर्गत कारवाई केली आहे. त्यांच्यावर असणारे आरोप, त्यांच्यावर दाखल असणारे गुन्हे यांची दखल घेऊन त्यांची सनद रद्द करावी, अशी मागणी पोलिसांनी महाराष्ट्र, गोवा बार असोसिएशनकडे केली आहे. तसेच यासाठी असोसिएशन चौकशीसाठी ज्या सदस्यांची नेमणूक करेल तो स्थानिक नसावा, असेही पोलिसांनी म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One Thousand Cores Property From Mataka Gambling