Belgaum | उपनोंदणी कार्यालयातील वन टाइम पासवर्ड (ओटीपी) आदेश अखेर मागे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

OTP One Time Password

उपनोंदणी कार्यालयातील वन टाइम पासवर्ड (ओटीपी) आदेश अखेर मागे

बेळगाव - उपनोंदणी कार्यालयात नोंदणीच्या वेळी सक्तीचे करण्यात आलेले वन टाइम पासवर्ड (ओटीपी) आदेश अखेर मागे घेण्यात आले आहे. ओटीपीमुळे वारंवार सर्व्हरची समस्या निर्माण होत असल्यामुळे हा निर्णय महसूल खात्याने घेतला आहे.

उपनोंदणी कार्यालयात जमिनीची खरेदी-विक्री, हस्तांतरण, गहाण ठेवणे, लग्नाची नोंदणी आदी प्रकारची नोंदणी करताना हा ओटीपी वापरला जात होता. नोंदणीच्या वेळेस खरेदीदार आणि विक्री करणारे दोघांच्याही मोबाईल क्रमांकावर प्रत्येकी ओटीपी पाठविला जात होता. हा ओटीपी प्राप्त झाल्यानंतर दोन्ही मंडळींना नोंदणीसाठी हा क्रमांक द्यावा लागत होता. महसूल खात्याच्या कावेरी संकेतस्थळावर ओटीपी नोंद केल्यानंतरच व्यवहार नोंदणी होत होता. यामुळे खरेदी-विक्रीत पारदर्शकता येण्याससह फसवणुकीचे प्रकार थांबले जाणार होते.

हेही वाचा: एसटी आंदोलनाची नवी ठिणगी; इस्लामपूर आगारातून वाटेगावला ST रवाना

पण कावेरी संकेतस्थळावर हे पासवर्ड नोंद करताना सर्व्हर समस्या निर्माण होत होती. त्यामुळे चार महिन्यात 21 दिवसांचा फरक नोंदणीसाठी जाणवत होता. यामुळे उपनोंदणी कार्यालयात वादावादीचे प्रसंग घडले होते. केवळ ओटीपीमुळे अनेकवेळा व्यवहार लांबणीवर पडण्याचे प्रकार घडत होते. ओटीपीची सक्ती मागे घेतली जावी, अशी मागणीही वाढली होती. २८ ऑक्टोबर रोजीच महसूल खात्याने ओटीपीची सक्ती मागे घेत त्या बाबतचे सुधारित आदेश बजावले होते. पण त्याची अंमलबजावणी करण्यात आली नव्हती. अखेर कालपासून (ता. ११) या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली असून आता खरेदी विक्री व्यवहारासाठी मोबाईलवर पाठवल्या जाणाऱ्या ओटीपीची पासवर्डची गरज भासणार नाही.

सुधारित आदेशानुसार, खरेदी आणि विक्री करणाऱ्या दोन्ही बाजूकडील लोकांना आपला मोबाईल नंबर मात्र नोंदणीवेळी द्यावे लागणार आहे. एका मोबाईल क्रमांकाचा केवळ दहा वेळा वापर करता येणार आहे. त्याहून अधिक व्यवहार शक्य होणार नाहीत. तशी व्यवस्थाच संकेतस्थळामध्ये करण्यात आली आहे. मात्र यामुळे आता नोंदणी कार्याला गती प्राप्त होणार आहे.

loading image
go to top