नगरमध्ये कांद्याने खाल्ला भाव

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात लाल कांद्याला पाच हजार रुपये प्रतिक्विंटल, असा उच्चांकी भाव निघाला. साठवलेला लाल कांदा व गावरान कांदाही संपल्याने बाजार समितीत आवक घटली आहे.

नगर - नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात लाल कांद्याला पाच हजार रुपये प्रतिक्विंटल, असा उच्चांकी भाव निघाला. साठवलेला लाल कांदा व गावरान कांदाही संपल्याने बाजार समितीत आवक घटली आहे.

नगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार समितीत आज कांद्याने पन्नाशी गाठली. क्रमांक एकच्या कांद्याला चार हजार पाचशे ते पाच हजार रुपये प्रतिक्विंटल भाव निघाला. दिवसेंदिवस आवक कमी होत असल्याने कांदा भाव खात आहे. नवरात्रादरम्यान लाल कांदा सहा हजार रुपयांपर्यंत जाण्याची शक्‍यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

अभूतपूर्व कांदाटंचाई
राज्यातील बाजार समित्यांत दोन दिवसांत कांद्याचे बाजारभाव १२०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटलने उसळले. बाजार दररोज नवे उच्चांक गाठत आहे. शेतकऱ्यांच्या चाळीतला कांदा संपत असताना नव्या आवकेचे चित्र पावसाळी नुकसानीमुळे दिवसेंदिवस धूसर होत चालले असून, ऑक्टोबर - नोव्हेंबरमध्ये देशात अभूतपूर्व कांदाटंचाई निर्माण होईल, असे दिसते. कांद्याच्या पुरवठ्याची पाइपलाइन आजपासून पुढचे किमान ७० दिवस मागणीच्या तुलनेत बऱ्यापैकी रिकामी आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर या दोन महिन्यांत सुमारे ३२ ते ३६ लाख टन इतकी कांद्याची देशांतर्गत गरज आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Onion High Rate in nagar