विनातपासणी जुन्या केसपेपरवर रुग्णांची ऑनलाईन नोंदणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

सांगली - पंडित दीनदयाल उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियान पथदर्शी प्रकल्प योजनेंतर्गत संगणकीयमध्ये (ऑनलाईन) जुन्या केसपेपरवरच नोंदणी केली जात असल्याचे उघडकीस आले आहे. जिल्ह्यात १ लाख ८८ हजार रुग्णांची नोंदणी झाली. राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये पहिले स्थान मिळवण्यासाठी स्पर्धा सुरू असल्याने आरोग्यपूर्व तपासणी न करताच नोंदणी केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. 

राज्य शासनाच्या वतीने स्वस्थ महाराष्ट्र अभियान पथदर्शी प्रकल्प योजनेंतर्गत संगणकीय (ऑनलाईन) नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत राज्यातील सहा विभागांतील सहा जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. पुणे विभागातून सांगली जिल्ह्याची निवड झाली. राज्यात पहिले स्थान पटकविण्यासाठी जिल्ह्यात स्पर्धा सुरू आहे. ऑनलाईन नोंदणी करताना रुग्णांची आरोग्यपूर्व तपासणी करणे आवश्‍यक आहे. वजन, उंची, रक्तदाब यासारखी तपासणी करावी लागते. परंतु, आरोग्यपूर्व तपासणीशिवाय नोंदणी करण्यात येत आहे. जुन्या केसपेपरवर रुग्णांची ऑनलाईन नोंदणी करण्यात येत असल्याची चर्चा रंगली आहे. या कारणांनी जिल्ह्याने ऑनलाईन नोंदणीत आघाडी घेतली आहे. ऑनलाईन नोंदणी अभियानात जिल्ह्यात सर्वाधिक १ लाख ८८ हजार रुग्णांची नोंद करण्यात आली. सांगलीपाठोपाठ बीडमध्ये १ लाख ४४ हजार नोंदणी झाली. नाशिक ३८ हजार, अकोला २६ हजार, चंद्रपूर २८ हजार आणि पालघर जिल्ह्यात ६ हजार रुग्णांची नोंदणी झाली. 

जिल्ह्यातील सर्व वयोगटांतील रुग्णांची नोंदणी करून आरोग्यपूर्व तपासणी आणि उपचार केले जाणार आहेत. 

शनिवारपर्यंत नोंदणी
जिल्ह्यासाठी दोन लाख रुग्णांच्या नोंदी होण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाचे आहे. रुग्णांवर उपचार करून आवश्‍यक वाटल्यास सरकारी रुग्णालयात शस्त्रक्रिया केली जाईल. तेथे होत नसल्यास राजीव गांधी जीवनदायी योजनेतून खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. ऑनलाईन नोंदणी शनिवार (ता. २७)पर्यंत केली जाणार आहे. 

Web Title: Online Registration of Patients on Old Case Paper