शैक्षणिक वर्ष सुरु करण्याच्या हालचाली : 74 हजार शिक्षकांना मिळणार आता ऑनलाईन प्रशिक्षण

मिलिंद देसाई
शनिवार, 11 जुलै 2020

 बेळगाव विभागातील 74 हजार शिक्षकांना ऑनलाईन प्रशिक्षण, सोमवारपासुन सुरुवात 

बेळगाव  : कोरोनामुळे थांबलेले शैक्षणिक वर्ष सुरु करण्याच्या हालचाली शिक्षण खात्याने पुन्हा एकदा सुरु केल्या आहेत. त्यानुसार बेळगाव विभागातील 9 जिल्हातील 74 हजार शिक्षकांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार असुन पहिल्या टप्पात प्राथमिक शाळांमधील 56 हजार शिक्षकांना दहा दिवसांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तर दहावी परीक्षेचे मुल्यमापन पुर्ण झाल्यानंतर माध्यमिक शाळांमधील 18 हजार शिक्षकांना प्रशिक्षण उपलब्ध करुन दिले जाणार आहे. 

कोरोनाचा संसर्ग वाढल्याने शाळा कधीपासुन सुरु होणार याबाबत अद्याप कोणत्याही प्रकारची स्पष्टता शिक्षण खात्याकडुन करण्यात आलेली नाही तरीही शाळा सुरु करण्याबाबत पुर्व सिध्दता करण्याची सुचना शिक्षकांना करण्यात आली असुन एक जुलैपासुन शिक्षकांना शाळेत हजर होण्याची सुचना करण्यात आली होती त्यानुसार शिक्षक शाळेला हजर होत आहेत. मात्र शाळा सुरु होण्यास अधिक विलंब झाला तर विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याचा विचार शिक्षण खात्याने सुरु केला आहे. त्यानुसार शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार असुन बेळगाव विभागातील बेळगाव, धारवाड, कारवार, बागलकोट, विजापूर, हावेरी, गदग, शिरसी, चिक्‍कोडी विभागातील डायट कार्यालये ग्लोबल मिट ऍपचा वापर करुन शिक्षकांना मार्गदर्शन करणार आहेत. 

हेही वाचा- करंजफेण हादरले : एकाच वेळी व एकाच कुटुंबातील एवढेजण  झाले बाधित -

2020 - 21 चे शैक्षणिक वर्ष सुरळीतरित्या पार पाडण्यासाठी शिक्षकांना सक्षम करणे हा ऑनलाईन प्रशिक्षण देण्याचा मुळ उद्देश आहे. प्रशिक्षणामुळे शिक्षकांना येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांना कशा प्रकारे शिकवायचे आहे याचे ज्ञान उपलब्ध होणार आहे. शुन्य बजेट प्रशिक्षण योजनेअंतर्गत ऑनलाईन प्रशिक्षण यशस्वी करण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे याला शिक्षकांनी प्रतिसाद द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

हेही वाचा-कोल्हापूरकरांनो वाहतूक नियम मोडणे पडणार महागात...

सविस्तर वाचा...

 

डायटतर्फे शहर विभागातील शिक्षकांना सोमवारपासुन दहा दिवसांचे ऑनलाईन प्रशिक्षण देण्यास सुरुवात होणार असुन पहिल्या दिवशी विभागानुसार डाटयचे अधिकारी शिक्षकांशी संवाद साधणार आहेत. प्रशिक्षणाला उपस्थित राहणाऱ्या शिक्षकांनी पाण्याची बाटली, जेवनाचा डबा, मास्क व सॅनिटायजर्स स्वत: घेऊन यावे असे कळविण्यात आले आहे.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online training for 74 thousand teachers in Belgaum division