
ज्याप्रमाणे सगळे एकत्र दिसता त्याप्रमाणे एकजूट दाखवा. तरच काही ना काही मिळेल असा संदेश प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिला.
सांगली : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात कॉंग्रेसने काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीत पक्षातील सर्वजण एकत्र आले होते. नेमका हाच धागा पकडून गटबाजी टाळण्याबाबत नेते मंडळींनी वक्तव्य केले. व्यासपीठावर ज्याप्रमाणे सगळे एकत्र दिसता त्याप्रमाणे एकजूट दाखवा. तरच काही ना काही मिळेल असा संदेश प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिला.
आजच्या ट्रॅक्टर रॅलीच्या निमित्ताने कॉंग्रेसमधील निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेली मंडळी व्यासपीठावर एकत्र आल्याची दखल घेतली गेली. प्रदेशाध्यक्ष थोरात यांनी केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली. सरकारच्या कृषी कायद्याविरोधात एकत्रित येण्याचे आवाहन केले. एकत्र येण्याचा धागा पकडून ठेवताना त्यांनी आजचे हे व्यासपीठ पुढेही टिकवा असा सल्ला दिला. एकत्रित राहिल्यास प्रत्येकाला काहीना काही मिळेल. आपल्या पूर्वजांची पुण्याई फार मोठी आहे. त्यामुळे ती नक्की उपयोगी पडेल. एकत्रित राहून जिल्ह्यातील कॉंग्रेस बळकट करा असेही त्यांनी आवाहन केले.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही सांगलीतील एकत्रित राहण्यासाठी वसंतदादा पाटील आणि डॉ. पतंगराव कदम यांनी केलेल्या कामाची आठवण करून दिली. एकदिलाने काम केले तर परिस्थिती बदलेल असे सांगितले. कॉंग्रेसमुक्त देश अशी घोषणा भाजपवाले करत असले तरी त्याला रोखण्याचे सामर्थ्य कॉंग्रेसमध्येच असल्याचे सांगून एकजुटीचे आवाहन केले.
राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनीही गटबाजी नसल्याचा निर्वाळा देताना आम्ही सर्वजण एकच असल्याचे सांगितले. तसेच यापुढे जिल्हा कॉंग्रेसमय करू अशी ग्वाही दिली. नेते मंडळींनी एकीकडे एकजुटीचे आवाहन केले तरी रॅलीच्या निमित्ताने वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. युवा नेत्यांनी वरिष्ठांच्या नजरेत येण्यासाठी रॅलीच्या निमित्ताने केलेली धडपड नेते मंडळींच्या नजरेतून चुकली नाही. त्यामुळेच त्यांनी एकजुटीचे आवाहन करावे लागल्याचे स्पष्ट झाले.
मंदिरे सुरू करण्याचे संकेत
रॅलीनंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री श्री. थोरात मंदिरे सुरू करण्याबाबत राज्यात लवकरच निर्णय घेतला जाईल. त्यासाठी नियमावली बनवली जाणार आहे असे सांगितले. राज्यात लवकरच कॉंग्रेसची लाट येईल असे सुतोवाच केले. सर्वांनी एकत्रित काम केल्यास जिल्ह्यात चांगले दिवस येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
संपादन : युवराज यादव