युवा महोत्सवातून पथनाट्य वगळण्यास विरोध

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जुलै 2018

सातारा - पथनाट्य हा सामाजिक व राजकीय चळवळीचा पाया आहे. तोच मोडण्याचा प्रयत्न यानिमित्ताने होणार असेल, तर असे प्रयत्न मोडून काढले पाहिजेत. उद्याचा रंगकर्मी, सामाजिक कार्यकर्त्याच्या जडणघडणीत पथनाट्याचा मोठा वाटा आहे. त्यामुळे ते युवा महोत्सवातून वगळू नये, असा सूर येथील रंगकर्मींमधून उमटला. शिवाजी विद्यापीठाने असा आतताई निर्णय घेऊ नये. याकरिता कुलगुरूंना सह्यांचे एक निवेदन पाठविण्यासाठी काही रंगकर्मींनी पुढाकार घेतला आहे.

सातारा - पथनाट्य हा सामाजिक व राजकीय चळवळीचा पाया आहे. तोच मोडण्याचा प्रयत्न यानिमित्ताने होणार असेल, तर असे प्रयत्न मोडून काढले पाहिजेत. उद्याचा रंगकर्मी, सामाजिक कार्यकर्त्याच्या जडणघडणीत पथनाट्याचा मोठा वाटा आहे. त्यामुळे ते युवा महोत्सवातून वगळू नये, असा सूर येथील रंगकर्मींमधून उमटला. शिवाजी विद्यापीठाने असा आतताई निर्णय घेऊ नये. याकरिता कुलगुरूंना सह्यांचे एक निवेदन पाठविण्यासाठी काही रंगकर्मींनी पुढाकार घेतला आहे.

युवा महोत्सवामधून पथनाट्य हा प्रकार वगळण्याची शिफारस विद्यापीठाच्या एका समितीने केली आहे. त्यावर १७ जुलै रोजी विद्यापीठ निर्णय घेणार आहे. स्पर्धेत सहभाग कमी मिळत असल्याचे कारण त्याकरिता देण्यात आलेले आहे. ‘हे म्हणजे आजारापेक्षा उपचारच भयंकर’ अशा प्रतिक्रिया कला क्षेत्रातून उमटल्या आहेत. 

चळवळ दाबण्याचा प्रयत्न 
सामाजिक कार्यकर्ते, रंगकर्मी कैलास जाधव म्हणाले, ‘‘राजकीय- सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांची पार्श्‍वभूमी ही पथनाट्याच्या चळवळीशी जोडली गेलेली आहे. पथनाट्य केवळ युवा महोत्सवापुरती 

मर्यादित न राहता ती लोकांपर्यंत पोचली पाहिजे. त्याकरिता विद्यापीठाने उलटी चळवळ चालवली पाहिजे. त्याऐवजी ते बंद करणार असला तर घातक ठरेल. पथनाट्याची चळवळ दाबण्याचा हा प्रयत्न आहे.’’

पथनाट्य हा उत्तम कलाप्रकार 
रंगकर्मी बाळकृष्ण शिंदे म्हणाले, ‘‘कलाकार उभे राहण्यासाठी आणि सामाजिक भान जागृत करण्यासाठी पथनाट्य हा एक उत्तम कलाप्रकार आहे. खरं तर ती एक चळवळ आहे. ही चळवळ मोडण्याचा प्रयत्न होणार असेल तर आपण समाजाचे मोठे नुकसान करत आहोत. तसे होऊ नये याकरिता साताऱ्यातील सर्व रंगकर्मींच्या वतीने सह्यांचे एक निवेदन कुलगुरूंना पाठवण्यात येईल. त्यासाठी साताऱ्यातून मी पुढाकार घेईन.’’

वगळून टाकणे ही पळवाट 
‘विचारांना चालना देणाऱ्या या कलाप्रकारास प्रतिसाद मिळत नसेल तर कारणं शोधण्याऐवजी तो वगळून टाकणं ही पळवाट ठरेल’ असे मत नाट्य लेखक- दिग्दर्शक राजीव मुळे यांनी नोंदवले. ‘‘सकसपणापेक्षा भपका व ग्लॅमरमागे धावण्याच्या या काळात युवा महोत्सवांमध्येही ग्लॅमरस कलाप्रकारांकडे अधिक दिसतो. तथापि, विद्यार्थिदशेतच आपल्या भोवतालाविषयी भान देणारा पथनाट्यासारखा कलाप्रकार युवकांनी हाताळला पाहिजे आणि कला विभागप्रमुखांनी त्यांना उद्युक्त केले पाहिजे,’’ असे श्री. मुळे यांनी सांगितले. 

प्रश्‍नांची दाहकता पोचते
पथनाट्य कलावंत सिंधू ठोंबरे म्हणाल्या, ‘‘आम्हाला सतावणारे प्रश्‍न वैयक्तिक सांगण्यापेक्षा, गाणी- संवाद- नाट्य या माध्यमातून पथनाट्यातून समाजाला सांगत असतो. प्रश्‍नांची दाहकता लोकांपर्यंत बरोबर पोचते. एक तासाच्या भाषणाने जे साध्य होत नाही, ते १५ मिनिटांच्या पथनाट्यातून साधता येते. 

हुरूप, सभाधिटपणा वाढला 
समाजकार्य महाविद्यालयात शिकणारी दिपेन्ती चिकने ही विद्यार्थिनी म्हणाली, ‘‘पथनाट्यात काम केल्याने आम्हा युवक- युवतींचा हुरूप, सभाधिटपणा वाढला. सामाजिक भान आणि अभिनयाची जान पथनाट्यातून मिळाली. कलाकार- कार्यकर्ते घडविणारे हे माध्यम अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोचायला हवे.’’

Web Title: Oppose to skip streetplay from youth festival