स्वाभिमानी संघटना फुटीच्या उंबरठ्यावर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्याऐवजी आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने शेतकरी संघटनांचे नेते आपली ताकद वाढवून काही जागा पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी होणाऱ्या आंदोलनांची धार मात्र, बोथट होणार आहे. 

सातारा : शेतकऱ्यांचे प्रश्‍न घेऊन पश्‍चिम महाराष्ट्रात रस्त्यावरचे आंदोलन करणारी राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना फुटीच्या उंबरठ्यावर आहे. सातारा जिल्ह्यातील संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी रयत क्रांती संघटनेत काल प्रवेश केला. यानिमित्ताने पश्‍चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर आंदोलने करणारी मंडळीच आता सत्ताधाऱ्यांच्या वळचणीला जाऊन बसू लागली आहेत. स्वाभिमानीतून फुटून सत्तेत सहभागी झालेले सदाभाऊ तर दुसरीकडे भाजप, शिवसेनेच्या विरोधातील एकजुटीत सहभागी झालेले राजू शेट्टी या दोन नेत्यांचे सत्तेचे वेड आता त्यांच्या पदाधिकाऱ्यांतही शिरले आहे. त्यामुळे आगामी काळात पश्‍चिम महाराष्ट्रात ऊस दरासाठी होणारी आंदोलने सत्ताधाऱ्यांच्या नियंत्रणाखाली होण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. 

शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळावा, हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन शेतकरी संघटनेची निर्मिती केली. या संघटनेच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांवर दबाव टाकून शेतकऱ्यांचे प्रश्‍न मार्गी लावण्यावर त्यांनी भर दिला. पण, बदलत्या परिस्थितीत शेतकरी संघटनेतील नेत्यांच्या भूमिकेनुसार संघटनेचीही शकले झाली. कोण जोशींवरील प्रेमापोटी त्यांच्या शेतकरी संघटनेत राहिले तर काहींनी स्वत:च्या संघटना काढल्या. पण, या सर्व संघटनांचा हेतू शेतकऱ्याचे प्रश्‍न सोडविणे हाच होता. सुरवातीला शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर या सर्व संघटनांची स्वतंत्र आंदोलने झाली. शेतीमालाला आधारभूत किंमत मिळावी यासाठी सरकारला कोंडीत पकडण्याइतपत आंदोलनाची धार होती. मात्र, बदलत्या परिस्थितीत शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविताना सत्तेत सहभागी झाल्यास अधिक सोप्या पध्दतीने ते प्रश्‍न सुटतील, हा हेतू डोळ्यासमोर ठेऊन काहींनी आपली संघटना सत्ताधारी पक्षांसोबत जोडली. परिणामी शेतकऱ्यांचे प्रश्‍न व आंदोलने बाजूला पडली आणि राजकारण आणि सत्तेसाठी मोठ्या पक्षांसोबत शेतकरी नेत्यांची तडजोड सुरू झाली. यातूनच पुढे आमदार, खासदार आणि मंत्रिपद मिळविण्याची स्पर्धा संघटनेच्या नेत्यांत लागली. त्यामुळे स्थानिक पातळीवरील पदाधिकारी व कार्यकर्तेच आंदोलनात उतरू लागले. नेतेमंडळी सत्ताधाऱ्यांसोबत तडजोडीचे राजकारण करू लागली. यातूनच आता माजी खासदार राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना फुटीच्या उंबरठ्यावर उभी राहिली आहे. नुकतेच "स्वाभिमानी'चे काही पदाधिकारी कृषी व पणन राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेत सहभागी झाले आहेत. या निमित्ताने रयत क्रांती संघटनेची ताकद पश्‍चिम महाराष्ट्रात वाढविण्याचा प्रयत्न सदाभाऊ करू लागले आहेत. आजपर्यंत राजू शेट्टी विरुद्ध सदाभाऊ खोत असा वाद पाहायला मिळाला. आता ऊसदराच्या निमित्ताने स्वाभिमानीचे कार्यकर्ते आणि रयत क्रांतीचे कार्यकर्ते असा वाद आगामी काळात पाहायला मिळणार आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: organization is at the brink of extinction.