राजर्षी शाहूंचे मूळ छायाचित्र उपलब्ध 

राजर्षी शाहूंचे मूळ छायाचित्र उपलब्ध 

कोल्हापूर - राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे 1902 ला लंडनमध्ये राजदरबारी पोषाखात काढलेल्या मुळ छायाचित्राची प्रत पुरातत्व विभागाला मिळाली आहे. लंडनमधील व्हिक्‍टोरिया ऍन्ड अल्बर्ट म्युझियममधून हे छायाचित्र मिळाले असून शाहू जन्मस्थळातील नियोजित शासकीय संग्रहालयात ते लावण्यात येणार आहे. शाहू जयंतीदिनी हे छायाचित्र पाहण्याची संधीही मिळणार आहे. 

शाहू जन्मस्थळ येथील संग्रहालयात शाहू महाराजाचे मुळ छायाचित्र लावण्यासाठी पुरातत्व विभागाने मुळ छायाचित्रांचा शोध सुरू केला. ब्रिटीश लायब्ररीमध्ये काही छायाचित्रे उपलब्ध असून लंडन येथील व्हिक्‍टोरिया ऍन्ड अल्बर्ट म्युझियममध्ये छायाचित्र संग्रहित असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर ते मिळवण्यासाठी पुढील प्रक्रिया व पत्रव्यवहार सुरू झाला होता. 
ऑगस्ट 1902 मध्ये एडवर्ड सातवा यांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी शाहू महाराज लंडनला गेले होते. त्यावेळी जगभरातील प्रतिष्ठीत व्यक्तींच्या छायाचित्रणासाठी प्रसिद्ध असलेल्या लफाएत स्टुडिओमध्ये त्यांनी राजदरबारी पोषाखात छायाचित्रण करून घेतले होते.

स्टुडिओ बंद झाल्यानंतर येथील सर्व दुर्मिळ छायाचित्रे व्हिक्‍टोरिया ऍन्ड अल्बर्ट म्युझिअमकडे सुपूर्द करण्यात आली. या छायाचित्राचे हक्क लंडन संग्रहालयाकडे आहे. हे छायाचित्र दहा वर्षासाठी प्रदर्शित करण्याचा परवाना दिला जातो.

म्युझियम व्यवस्थापनाने साडेसातशे पौंड इतके म्हणजेच सुमारे ऐंशी हजारांचे शुल्क आकारून या छायाचित्राची प्रत उपलब्ध करून दिली. मात्र, या छायाचित्राची केवळ एकच प्रत मुद्रित करण्याची व अन्य कोणत्याही ठिकाणी प्रदर्शित अथवा प्रसिद्ध न करण्याची हमी लेखी देण्यात आली आहे.

या एकूणच प्रक्रियेसाठी पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांनी तत्काळ मंजुरी दिली. हे छायाचित्र तातडीने उपलब्ध होण्यासाठी लंडन येथील अपर्णा मालाडकर यांचे सहकार्य झाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com