पाकिटे आली.. पाकिटे आली...

elections11.JPG
elections11.JPG

नगर : "पाकिटे आली...पाकिटे आली...' असा एकच गलका झाला नि सर्वांची तोंडे आवाजाच्या दिशेने फिरली; मात्र आलेली पाकिटे पाहून सर्वांचाच भ्रमनिरास झाला. उजळलेले चेहरे एकदम पडले, हिरमुसले नि सगळे पुन्हा आपल्या कामाला लागले.

विधानसभा निवडणुकीसाठी नगर जिल्ह्यातील 3722 मतदान केंद्रांवर एकूण 24 हजार 564 अधिकारी- कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अधिकारी- कर्मचाऱ्यांना मतदान यंत्रांसह रविवारी (ता. 20) केंद्रांवर सोडण्यात आले. कर्मचाऱ्यांनी घरून येताना डबे आणले होते; मात्र त्यातील काहींचे डबे रविवारी दुपारीच संपले. मतदान केंद्रावर रात्रीच्या जेवणाची सोय होईल आणि नाहीच झाली, तर जवळील हॉटेलमधून जेवण मागवू, असे नियोजन अनेकांनी केले होते; मात्र अनेक मतदान केंद्रे ग्रामीण भागात होती. नियुक्तीच्या ठिकाणापासून दूर-दूरपर्यंत हॉटेलच नसल्याचे अधिकारी- कर्मचाऱ्यांना गावात गेल्यावरच समजले.

गावात हॉटेल नसले, तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काही तरी सोय केलीच असेल, अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांना होती; मात्र तीही फोल ठरली. गावात तरी काही मिळते का, याची चाचपणी काहींनी केली; मात्र पोटपूजेची काही व्यवस्था होताना दिसत नव्हती. गैरसोयीच्या गावात महसूल यंत्रणेने काही तरी सोय केली असेल, अशी आशा कर्मचाऱ्यांना होती; मात्र त्यांच्याकडूनही तशी सोय केलेली नव्हती. बरोबर बांधून आणलेल्या डब्यातील उरलेली शिळी भाकरी खाऊनच कर्मचाऱ्यांना झोपावे लागले. रात्र अर्धपोटी गेली; पण सकाळी तरी काही सोय नक्की केली असेल, अशी अपेक्षा होती. मात्र, कर्मचाऱ्यांच्या पदरी पुन्हा एकदा अपेक्षाभंगच आला.

सकाळीही कर्मचाऱ्यांना चहा व नाश्‍ता मिळालाच नाही. सकाळी सात वाजताच कर्मचारी मतदानप्रक्रियेच्या कामाला लागले. अनेकांच्या पोटात कावळे ओरडत होते. दरम्यान, आज (सोमवारी) सकाळी 11 वाजता नगर शहरातील एका मतदानकेंद्राची तपासणी करण्यासाठी निवडणूक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अचानक भेट दिली. त्यांच्या हातातील पाकिटे पाहून, अधिकाऱ्यांनी आपल्यासाठी जेवणच आणल्याचा अनेकांचा समज झाला.

अधिकाऱ्यांची वाहने मतदान केंद्राच्या परिसरात येताच कर्मचाऱ्यांचे चेहरे उजळले. "पाकिटे आली रे... पाकिटे आली...' असे ते एकमेकांना सांगू लागले. मात्र, त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. वाहनातून उतरलेल्या अधिकाऱ्यांच्या हातातील कागदपत्रांची पाकिटे पाहून, आनंदाने उजळलेले चेहरे हिरमुसले. कर्मचारी उपाशीपोटी पुन्हा कामाला लागले.


पैसे नको, जेवण द्या...
निवडणुकीचे काम, राष्ट्रीय कर्तव्य समजून आम्ही ते करायला कधीच नकार देत नाही; पण हे काम करताना किमान आमच्या जेवणाकडेही प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. दर निवडणुकीला आम्ही उपाशीपोटीच काम करतो. जेवणाचे आम्हाला पैसे नको; पोटभर जेवण द्या, अशी प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांनी दिली.

रात्रभर जीव मुठीत
निवडणुकीसाठी प्राथमिक शाळाच मतदान केंद्रे होती. मात्र, बहुतेक शाळांची दुरवस्था झाली आहे. कर्मचाऱ्यांना झोपण्यासाठी तेथे कोणतीही व्यवस्था नव्हती. वर्गखोल्यांची तुटलेली तावदाने, मोडक्‍या खिडक्‍या, त्यातून येणारे पावसाचे पाणी नि गार वारे, यामुळे कर्मचाऱ्यांनी कुडकुडतच रात्र काढली. अनेक शाळांच्या इमारती मोडकळीस आल्याने भिंतही पडण्याची भीती होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांना अक्षरश: जीव मुठीत धरूनच रात्र काढावी लागली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com