विजयाच्या धुंदीत राहिला खर्चाचा हिशोब! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

सातारा - जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणुकीचा निकाल लागून दीड महिना झाला, तरी निवडून आलेल्या 127 उमेदवारांनी अद्याप निवडणुकीत झालेल्या खर्चाचा हिशोब जमा केलेला नाही. त्यामुळे निवडणूक विभागाने या उमेदवारांना अपात्र का ठरवू नये, अशी नोटीस बजावण्यास सुरवात केली आहे. 

सातारा - जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणुकीचा निकाल लागून दीड महिना झाला, तरी निवडून आलेल्या 127 उमेदवारांनी अद्याप निवडणुकीत झालेल्या खर्चाचा हिशोब जमा केलेला नाही. त्यामुळे निवडणूक विभागाने या उमेदवारांना अपात्र का ठरवू नये, अशी नोटीस बजावण्यास सुरवात केली आहे. 

निवडणुकीच्या निकालानंतर विजयी झालेल्या उमेदवारांनी निवडणुकीत केलेल्या खर्चाची तपशीलवार माहिती एक महिन्यात निवडणूक विभागाकडे द्यायचा असतो. जो सदस्य दिलेल्या मुदतीत हा हिशोब जमा करणार नाही, तो निवडणूक आयोगाच्या नियमानुसार अपात्र ठरू शकतो. त्यासाठी जिल्हाधिकारी संबंधित सदस्याला नोटीस बजावून त्याचे म्हणणे मांडण्याची संधी देतात. समर्पक म्हणणे नसल्यास संबंधित सदस्य अपात्र ठरतो. 

जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक निकाल लागून तब्बल दीड महिना झाला, तरी जिल्ह्यातील 127 विजयी उमेदवारांनी आपला खर्चाचा हिशोब जमा केलेला नाही. निवडणुकीत विजय झाला, की सदस्य सत्कार समारंभात गुंतून राहतात. काही जण मतदारांच्या भेटीवर असतात. आता यात्रा, जत्रांचा हंगाम असल्याने गावोगावच्या यात्रांना भेट देण्यावर त्यांचा भर राहतो. या सर्व लगबगीत निवडणुकीत केलेल्या खर्चाची आकडेवारी जमा करण्यास अनेक जण विसरतात. आजारपण, विविध कारणांमुळे निवडणुकीतील खर्चाचा तपशील निवडणूक विभागाकडे दिलेल्या वेळेत जमा करण्याकडे उमेदवारांचे दुर्लक्ष होते. खर्चाचा हिशोब जमा करण्याचे राहिले आहे, हे निवडणूक विभागाची नोटीस असल्यावरच संबंधित सदस्यांच्या लक्षात येते. खर्चाचा हिशोब ऐनवेळी जमा करताना सदस्य व त्यांच्या कार्यकर्त्यांची धावपळ होते. निवडणूक खर्चाचा हिशोब न दिलेल्या सदस्यांना निवडणूक विभागाने नोटीस पाठवून तातडीने खर्चाचा हिशोब जमा करा अन्यथा अपात्र ठरविण्याबाबतची नोटीस बजावण्यास सुरवात केली आहे. 

जिल्हा परिषदेच्या 40 सदस्यांचा समावेश 
जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक होऊन दीड महिना झाल्यानंतरही निवडून आलेल्या 127 सदस्यांनी आपला खर्चाचा हिशोब जमा केलेला नाही. त्यामध्ये जिल्हा परिषदेवर निवडून गेलेले 40, तर पंचायत समितीवर निवडून गेलेल्या 87 सदस्यांचा समावेश आहे. 

Web Title: Panchayat Samiti and Zilla Parishad election results