पाचगणी बसस्थानकात पाणीच पाणी

पाचगणी बसस्थानकात पाणीच पाणी

भिलार : पाचगणी गिरिस्थानावरील बस स्थानक आणि त्यावर नुकतेच खर्च केलेले 12 लाख रुपये पाण्यात गेल्यामुळे प्रवासी चक्क कॉंक्रिटच्या स्थानकात भिजत आहेत, तर केलेला खर्च अक्षरशः पाण्यात गेला आहे. 

पाचगणी गिरिस्थानावरील बस स्थानकाचे रुपडे पालटण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने 12 लाख रुपये खर्च करत अंतर्गत सजावट, रंगरंगोटी, ग्रॅनाईटयुक्त बिम, पार्टेक्‍स फरशी, पाणी वाहून नेण्यासाठी प्लबिंगमधील पाइप असा खर्च करत इमारत सुसज्ज बनवली आहे. मात्र, हे काम करताना वर्षानुवर्षे होत असलेले छताचे लिकेज न काढता अंतर्गत सजावटीचा मुलामा बस स्थानकाला दिलेला आहे. तर नव्याने प्लबिंगचे बसवलेले पाइप गायब झाल्यामुळे स्लॅबच्या होलमधील पाणी उंचावरून सर्व फलटांवर कोसळत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. परिणामी सर्व स्थानकामध्ये पाण्याचे तळे साचले आहे. संपूर्ण बस स्थानक हे जलमय झालेले आहे. कर्मचाऱ्यांनी प्लॅस्टिकचा ड्रम लावून पाणी अडवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. दरवर्षी पावसाळ्यामध्ये व्यवस्थित दुरुस्ती न करता "लावलिजाव अन्‌ टिमकी बाजाव' काम केले जात असल्यामुळे बस स्थानकात पाण्याचे तळे साचत आहे. अधिकारी फक्त पाहणी करून जातात. आतापर्यंत दोन ते तीन वेळा फक्त पाहणी झाली. कारवाई मात्र शून्य झाली. पाहणीचा देखावा केला जात आहे. 
बसण्याची आसनव्यवस्थाच पाण्यात जात असल्याने पर्यटक व प्रवाशांना एसटीची वाट पाहात ताटकळत उभे राहण्याशिवाय पर्यायच राहत नाही. एसटी महामंडळाने त्वरित लक्ष देऊन बस स्थानकाच्या इमारतीस लागलेली गळती काढून प्रवासी पर्यटकांची होणारी गैरसोय थांबवावी तसेच पावसाळ्यापूर्वी झालेल्या कामाची पाहणी करावी व संबंधित ठेकेदाराची चौकशी करून 
दोषी आढळल्यास त्याला "ब्लॅक लिस्ट'मध्ये टाकावे, अशी मागणी प्रवाशांमधून जोर धरत आहे. 


""पाचगणी बस स्थानकाचे अंतर्गत काम पूर्ण झाले असून स्लॅब गळतीचे काम सध्या पावसाळा असल्याने करता येत नाही. पावसाने उसंत घेताच लिकेज काढण्यात येणार आहे.'' 
सुरेश मोहिते, कनिष्ठ अभियंता, वाहतूक नियंत्रण विभाग, सातारा 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com