Kamla Ekadashi : कमला एकादशीनिमित्त पंढरीत दोन ते अडीच लाख भाविकांची मांदियाळी

अधिक श्रावण महिन्यातील कमला एकादशीच्या निमित्ताने शनिवारी (ता. २९) पंढरीत दोन ते अडीच लाख भाविकांची गर्दी झाली होती.
Pandharpur
Pandharpursakal

पंढरपूर - अधिक श्रावण महिन्यातील कमला एकादशीच्या निमित्ताने शनिवारी (ता. २९) पंढरीत दोन ते अडीच लाख भाविकांची गर्दी झाली होती. कमला एकादशी दिवशी चंद्रभागा नदीमध्ये लाखो भाविकांनी पवित्र स्नानाची पर्वणी साधली. दरम्यान श्री विठ्ठलाच्या दर्शनाची रांग गोपाळपूर रस्त्याच्याही पुढे गेली होती. श्रींच्या दर्शनासाठी आज दहा ते बारा तास लागत होते.

अधिक श्रावण महिन्यातील कमला एकादशीला चंद्रभागा नदीमध्ये स्नान केल्यास गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्य मिळते असे मानले जाते. ही पर्वणी साधण्यासाठी राज्यभरातून सुमारे दोन ते अडीच लाख भाविक पंढरीत दाखल झाले होते.

एकादशी दिवशी भल्या पहाटेपासूनच लाखो भाविकांनी चंद्रभागा नदीच्या वाळवंटामध्ये गर्दी केली होती. यंदा चंद्रभागा नदीमध्ये मुबलक पाणी असल्याने भाविकांनी स्नानाचा आनंद लुटला. महिला भाविकांची कपडे बदलण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने महिला भाविकांसाठी चार चेंजिंग रूमची सोय उपलब्ध करून दिली होती.

तसेच नदीपात्रात कोणी बुडवून पडू नये यासाठी पंढरपूर नगरपालिका प्रशासनाने स्पीड बोटीसह जीव रक्षक पथक तैनात केले होते. नदीमध्ये पवित्र स्नान केल्यानंतर श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविक दर्शन बारीमध्ये जाऊन उभे राहिले होते.

दर्शन बारीच्या चारही पत्रा शेड भाविकांच्या गर्दीने भरून गेल्यानंतर गोपाळपूर रस्त्याच्या पुढे दर्शन रांग गेली होती. दर्शन रांगेतील भाविकांना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने साबुदाणा खिचडी व चहा तसेच पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात आले.

दरम्यान श्री विठ्ठल दर्शन घेऊन मंदिरा बाहेर आलेले गंगाधर दगडू चौरे (रा. अंबड, जि. जालना) 'सकाळ' शी बोलताना म्हणाले, आम्ही आमच्या गावातील भजनी मंडळातील ग्रामस्थ शुक्रवारी रात्री दहा वाजता गोपाळपूर रस्त्यावरील दर्शन रांगेमध्ये उभे होतो.

शनिवारी सकाळी दहा वाजता श्री विठ्ठलाचे दर्शन प्राप्त झाले. अधिक महिन्यातील एकादशी दिवशी दर्शन झाल्याने समाधान वाटले. एकादशीच्या निमित्ताने पंढरीतील विविध मठ धर्मशाळांमध्ये विठू नामाचा जयघोष सुरू होता. भजन, कीर्तन यामध्ये भाविक तल्लीन झाल्याचे दिसून आले. अवघी पंढरी नगरी आज विठू नामाच्या जयघोषाने दुमदुमून गेली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com