नगरसेवक संदिप पवार खून प्रकरणी तीन जणांना अटक

अभय जोशी
गुरुवार, 22 मार्च 2018

पंढरपूर: नगरसेवक संदिप पवार यांच्या खूनाच्या कटात सहभाग घेतल्याच्या कारणावरुन आज (गुरुवार) पंढरपूर शहर पोलिसांनी पंढरपूर शहरातील आकाश हनुमंत बुराडे (वय 20), रुपेश उर्फ लल्ल्या दशरथ सुरवसे (वय 21) आणि सचिन भगवान वाघमारे (वय 32) या तीन जणांना अटक केली. या तीन जणांनी संदिप पवार यांची त्या दिवशीची माहिती मुख्य आरोपी अक्षय उर्फ बबलू सुरवसे यास दिल्याचे प्राथमिक तपासात पोलिसांना समजले आहे. तिन्ही जणांना 26 मार्च पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ठाणे पोलिसांनी या प्रकरणातील चार जणांना यापूर्वीच अटक केलेली आहे.

पंढरपूर: नगरसेवक संदिप पवार यांच्या खूनाच्या कटात सहभाग घेतल्याच्या कारणावरुन आज (गुरुवार) पंढरपूर शहर पोलिसांनी पंढरपूर शहरातील आकाश हनुमंत बुराडे (वय 20), रुपेश उर्फ लल्ल्या दशरथ सुरवसे (वय 21) आणि सचिन भगवान वाघमारे (वय 32) या तीन जणांना अटक केली. या तीन जणांनी संदिप पवार यांची त्या दिवशीची माहिती मुख्य आरोपी अक्षय उर्फ बबलू सुरवसे यास दिल्याचे प्राथमिक तपासात पोलिसांना समजले आहे. तिन्ही जणांना 26 मार्च पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ठाणे पोलिसांनी या प्रकरणातील चार जणांना यापूर्वीच अटक केलेली आहे. पोलिस आता संदिप अधटराव आणि विकी मोरे या दोन आरोपींचा शोध घेत आहेत.

नगरसेवक संदिप पवार यांचा गुढी पाडव्याच्या दिवशी (ता. 18) गोळ्या झाडून व नंतर कोयत्याने वार करुन निघृण खून करण्यात आला. त्यानंतर मयत पवार यांच्या आई माजी नगराध्यक्षा व विद्यमान नगरसेविका सुरेखा दिलीप पवार यांनी 19 मार्च रोजी पहाटे पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.

संदिप पवार यांचा लहान भाऊ प्रदिप उर्फ भैय्या पवार याच्या सोबत आरोपी अक्षय उर्फ बबलू सुरवसे याचे चौकात उभे राहण्यावरुन व रागाने पाहिल्यावरुन मारामारी झाली होती. त्याचा राग मनात धरुन आरोपीने अक्षय उर्फ बबलू सुरवसे याने विकी उर्फ विकास मोरे, संदिप अधटराव यांच्यासह सहा ते सात जणांच्या मदतीने संदिप पवार यांचा खून केला असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय उर्फ बबलू धनंजय सुरवसे, पुंडलिक शंकर वनारे, मनोज शंकर शिरसीकर आणि भक्तराज ज्ञानेश्‍वर धुमाळ या चार आरोपींना 19 मार्च रोजी सायंकाळी माजीवाडा ठाणे येथे ठाणे पोलिसांनी पेट्रोल पंप लुटण्याच्या तयारीत असताना अटक केली होती. तर संदिप अधटराव आणि विकी मोरे हे दोघे जण पोलिसांना न सापडता तेथून पळून गेले होते.

दरम्यान पंढरपूर शहर पोलिसांनी संदिप पवार यांच्या खूनाच्या कटात सहभागी झाल्याच्या कारणावरुन आज आकाश हनुमंत बुराडे, रुपेश उर्फ लल्ल्या दशरथ सुरवसे आणि सचिन भगवान वाघमारे या तीन जणांना अटक केली आहे. या तीन जणांनी मयत संदिप पवार यांची त्या दिवशीची माहिती मुख्य आरोपीस दिल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. मयत पवार यांनी त्रास दिल्यामुळे त्यांच्या खूनाच्या कटात सहभागी झाल्याचे आज अटक केलेल्या तीन आरोपींनी सांगितले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे यांनी दिली. तिन्ही जणांना येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री.आरदवाड यांनी 26 मार्च पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title: pandharpur news corporator sandeep murder case 3 arrested