पंढरपुरचे नगरसेवक संदिप पवार यांच्यावर हल्ला ; उपचारादरम्यान मृत्यू

अभय जोशी
रविवार, 18 मार्च 2018

येथील नगरसेवक संदिप दिलीप पवार (वय 38) यांच्यावर आज दुपारी एकच्या सुमारास स्टेशन रोडवरील हॉटेल श्रीराममध्ये खुनी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी अवस्थेतील पवार यांचा येथील खाजगी रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.  

पंढरपूर : येथील नगरसेवक संदिप दिलीप पवार (वय 38) यांच्यावर आज दुपारी एकच्या सुमारास स्टेशन रोडवरील हॉटेल श्रीराममध्ये खुनी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी अवस्थेतील पवार यांचा येथील खाजगी रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.  

याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की येथील वॉर्ड क्रमांक 10 चे नगरसेवक संदिप पवार हे आज दुपारी स्टेशन रोडवरील हॉटेल श्रीराममध्ये चहा पिण्यासाठी आले होते. त्यावेळी 7 ते 8 अज्ञात तरूण तोंडाला मास्क बांधून तेथे आले. त्यांनी पवार यांच्यावर पिस्तूलने जवळून गोळीबार केला. त्यानंतर काही जणांनी त्यांच्यावर सत्तुरने वार करून सर्वजण पळुन गेले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या घटनेची माहिती समजताच सहाय्यक पोलिस अधीक्षक निखील पिंगळे, पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे हे तातडीने घटनास्थळी आले. त्यांनी घटनेची प्राथमिक माहिती घेऊन तातडीने तपास सुरू केला. घटना घडलेल्या परिसरातील दोन ते तीन ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज मिळवून पोलिस पुढील तपास करीत आहेत. 

दरम्यान, या घटनेनंतर स्टेशन रस्त्यावरील सर्व व्यापा-यांनी आपली दुकाने बंद केली. या घटनेमुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी दक्षता म्हणून नगरसेवक संदीप पवार यांचे निवासस्थान असलेल्या भादुले चौक परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवला आहे. 

Web Title: pandharpur news corporator sandeep pawar attack crime