कारखानदार, सहकारमंत्र्यांच्यात साटेलोटे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

पंढरपूर - या वर्षीच्या ऊस गाळप हंगामासाठी दर निश्‍चित करण्यासाठी ऊसदर नियंत्रण समिती बैठक अद्याप झालेली नसतानाही राज्याचे सहकारमंत्री ऊस गाळप हंगामाच्या प्रारंभासाठी फिरू लागले आहेत. सहकारमंत्र्यांनी पहिली उचल जाहीर करावी; अन्यथा त्यांना राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा बळिराजा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजय पाटील-घाटणेकर यांनी आज दिला. साखर कारखानदार आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यात साटेलोटे असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

या वर्षीच्या गाळप हंगामासाठी पहिली उचल तीन हजार रुपये द्यावी, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी यासह विविध मागण्यांसाठी सरकारच्या विरोधात संघटनेच्या वतीने राज्यभर आंदोलन हाती घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यासाठी येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद झाली. या वेळी ते बोलत होते. घाटणेकर म्हणाले, "चार महिन्यांपासून कर्जमाफीचा गोंधळ सुरू आहे. प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप एक रुपयाही जमा झाला नाही. खरीप व रब्बी हंगामात एकाही शेतकऱ्याला कर्ज मिळाले नाही, हे सरकारचे अपयश आहे. गेल्या वर्षी केंद्र सरकारने निर्यात साखरेवर 20 टक्के कर लावल्यामुळे साखरेचे दर पडले. अशातच पुन्हा पाच लाख टन साखर आयात करण्याचा घाट घातला आहे. सध्याच्या बाजारभावानुसार उसाला पहिली उचल तीन हजार रुपये देणे शक्‍य आहे.

खासदार शेट्टींचा फार्स!
खासदार राजू शेट्टी सध्या ठिकठिकाणी ऊस परिषदा घेत आहेत. यापूर्वीदेखील त्यांनी अशा परिषदा घेतल्या; परंतु तडजोडीचे राजकारण करून शेतकऱ्यांच्या मागणीशी प्रतारणा केली आहे. सोलापूर जिल्ह्यात त्यांनी पुन्हा ऊस परिषद घेण्याचे जाहीर केले आहे. केवळ त्यांचा हा राजकारणासाठीचा फार्स असल्याची टीका घाटणेकर यांनी या वेळी केली.

Web Title: pandharpur news factory owner & minister compramise for sugarcane rate