पंढरपूरः श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी टोकन पध्दत

अभय जोशी
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

पंढरपूर ः श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना तासन्‌तास रांगेत उभे रहावे लागू नये यासाठी तिरुपती प्रमाणे टोकन (ऍक्‍सेस कार्ड) देण्याची व्यवस्था सुरु करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. 7 सप्टेंबर रोजी होणाऱ्या श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीच्या बैठकीत त्या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यावर तातडीने पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

पंढरपूर ः श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना तासन्‌तास रांगेत उभे रहावे लागू नये यासाठी तिरुपती प्रमाणे टोकन (ऍक्‍सेस कार्ड) देण्याची व्यवस्था सुरु करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. 7 सप्टेंबर रोजी होणाऱ्या श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीच्या बैठकीत त्या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यावर तातडीने पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पूर्वी यात्राकाळातच दर्शनासाठी अनेक तास रांगेत उभे रहावे लागत होते. अलिकडे वर्षभर भाविकांची गर्दी होते. त्यामुळे अनेक वेळा भाविकांना रांगेत तिष्ठत थांबावे लागते. मागील वर्षी पासून मंदिर समितीने ऑन लाईन दर्शन व्यवस्था सुरु केली आहे. परंतु, ऑन लाईन बुकींग न केलेल्या भाविकांना मात्र रांगेत उभा रहावे लागते. त्यावर उपाय म्हणून मागील मंदिर समितीच्या काळात तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी शंभर रुपये शुल्क आकारुन तातडीच्या दर्शनाची स्वतंत्र व्यवस्था करण्याचा ठराव केला होता परंतु वारकरी सांप्रदायातून त्याला विरोध झाल्याने तशी व्यवस्था कार्यान्वित होऊ शकली नाही.

दरम्यान, भाविकांना रांगेत तिष्ठत थांबवण्याऐवजी तिरुपतीच्या धर्तीवर टोकन देण्याची व्यवस्था सुरु करण्याचा प्रस्ताव श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्री.तेली यांनी तयार केला आहे. मंदिरा लगतचे संत तुकाराम भवन, दर्शन मंडप, बस स्थानक, रेल्वे स्थानक, विविध ठिकाणचे वाहनतळ आदीसह प्रमुख मठांच्या ठिकाणी टोकन देण्याची काऊंटर सुरु करण्याची योजना आहे. संबंधित भाविक काउंटर वर गेल्यानंतर त्याचे बोटाचे ठसे व छायाचित्र नोंदवून किती वेळानंतर दर्शन होईल त्याची वेळ असलेले टोकन अवघ्या दोन मिनिटात संबंधित भाविकास दिले जाईल. दर्शनाची नेमकी वेळ समजल्याने रांगेत तिष्ठत उभे राहण्याऐवजी संबंधित भाविक पंढरपूर शहरात फिरु शकेल. अन्य मठ व मंदिरे पाहू शकेल. त्यानंतर त्याला दिलेल्या वेळी मंदिरात जाऊन अवघ्या काही मिनिटात दर्शन घेता येईल. अशा पध्दतीची व्यवस्था सध्या तिरुपती व शिर्डी येथे करण्यात आली आहे.

सध्या झटपट दर्शनासाठी काही एजंट भाविकांकडून पैसे घेऊन मंदिर समितीच्या काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरुन झटपट दर्शन घडवतात. त्या प्रकाराला कार्यकारी अधिकारी श्री.तेली यांनी आळा घालण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. लोकांना झटपट दर्शनाला सोडले नाही म्हणून थेट मंदिर समितीच्या व्यवस्थापकांना मारहाण होण्याची घटना काही दिवसापूर्वी घडली होती. त्या पार्श्‍वभूमीवर टोकन व्यवस्था कार्यान्वित झाली तर एजंटगिरी बंद होणार आहे.

मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी समितीच्या मागील बैठकीत प्रलंबित योजनांचा आढावा घेऊन त्यांना गती देण्यासाठी निर्णय घेतल्याने त्यांच्या भूमिकेचे मोठ्या प्रमाणावर स्वागत झाले. समितीच्या येत्या बैठकीत डॉ. भोसले यांनी दर्शन व्यवस्थेसाठी श्री.तेली यांनी तयार केलेल्या प्रस्तावाला मान्यता दिल्यास दर्शनाचा काळा बाजार बंद होण्यास मोठी मदत होणार आहे.

""दरवर्षी एक कोटीहून अधिक लोक भेट देणाऱ्या ठिकाणी केंद्र शासनाच्या पर्यटन विभागाच्या माध्यमातून टोकन (ऍक्‍सेस कार्ड) देण्याची व्यवस्था करुन दिली जाते. पंढरपूरला एक कोटीहून अधिक लोक येत असल्याने केंद्राच्या त्या योजनाचा लाभ येथील प्रस्तावित व्यवस्थेसाठी घेण्यात येणार आहे. 7 सप्टेंबर रोजी समितीच्या बैठकीत मंजूरी मिळाल्यास तातडीने पुढील कार्यवाही करणार आहे, अशी माहिती कार्यकारी अधिकारी संजय तेली यांनी आज "सकाळ" शी बोलताना दिली.

Web Title: pandharpur news The token system for the visit of vitthal rukmini mandir