पंढरपूर-टेंभूर्णी महामार्ग बनला निसरडा

सूर्यकांत बनकर
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

करकंब (सोलापूर) : आज दिवसभर चालू असलेल्या रिमझिम पावसामुळे पंढरपूर-टेंभूर्णी महामार्गाची अवस्था अक्षरशः निसरड्या रस्त्यासारखी झाली असून प्रवाशांना जीव मुठीत धरुन वाहने चालवावी लागत आहेत. 

करकंब (सोलापूर) : आज दिवसभर चालू असलेल्या रिमझिम पावसामुळे पंढरपूर-टेंभूर्णी महामार्गाची अवस्था अक्षरशः निसरड्या रस्त्यासारखी झाली असून प्रवाशांना जीव मुठीत धरुन वाहने चालवावी लागत आहेत. 

पंढरपूर-टेंभूर्णी मार्गाचे राष्ट्रीय मार्गात रुपांतर करुन त्याच्या रुंदीकणासह दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. टेंभू्र्णीपासून भोसेपाटी पर्यंतचे डांबरीकरण पूर्ण झाले आहे. मात्र भोसेपाटीच्या पुढील एक किलोमीटरपासून सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. हे काम करत असताना रस्ता दोन्ही बाजुंनी उचकटून काम हाती घेण्यात आल्याने वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडत आहे. शिवाय कामही अतिशय संथ गतीने चालू असून बऱ्याच वेळा बंद असते. एका बाजुने काही भागावर सिमेंट काँक्रिटीकरणासाठी कच्चा थर देऊन तीन महिन्याचा कालावधी होत आला तरी अद्याप त्यावर पक्का थर देण्यात आला नाही. त्यामुळे हा भाग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

दुसऱ्या एकाच बाजुने दुहेरी वाहतूक चालू असून ह्या भागाचेही खोदाईनंतर व्यवस्थित खडीकरण व मुरमीकरण करण्यात आले नाही. त्यामुळे हा मार्ग खाचखळग्यांचा बनला आहे. त्यामुळे एखादे वाहन जात असताना धुळीचे लोट उडतात. आता तर दिवसभर पावसाची रिमझिम चालू असल्याने हा मार्ग अक्षरशः दलदलीचा बनला असून त्यास एखाद्या पाणंद रत्याचे रुप आले आहे. या मार्गावरुन तालुक्याच्या ठिकाणी दररोज दुचाकीवरुन ये-जा करणाऱ्या शेकडो प्रवाशांची सध्या चांगलीच तारांबळ उडत आहे.

कामाचा वेग वाढविण्याची गरज-
या मार्गाचे काम अतिशय संथ गतीने चालू असून या मार्गावरील वाहतुकीला होणाऱ्या अडचणीचे कसलेही गांभिर्य संबंधितांना दिसत नाही. वास्तविक पाहता काम हाती घेतले तेव्हा भाविकांचा विचार करुन आषाढी वारी पूर्वी काम पूर्ण होईल अशी अपेक्षा होती. मात्र विठ्ठलभक्तांना येथील खाचखळग्यातूनच पंढरीची वारी पूर्ण करावी लागली. त्यानंतर आता एक ऑक्टोबर पासून साखर कारखान्यांचा हंगाम चालू होणार आहे. आणि याच मार्गाला लागून तालुक्यातील महत्वाचा विठ्ठल सहकारी साखर कारखाना आहे. शिवाय येथून इतर पाच-सहा कारखान्यांसाठी ऊस वाहतूक होत असते. त्यामुळे या वाढत्या वाहतुकीचा विचार करुन पुढील एक महिन्यात एका बाजुचे तरी सिमेंट काँक्रिटीकरण पूर्ण करणे गरजेचे आहे. यासाठी संबंधितांनी जाणिवपूर्वक लक्ष घालणे आवश्यक आहे.

Web Title: pandharpur tembhurni high way becomes slippery