VIDEO : टेक्‍निकल बापूंची कमाल; एकरात ऊस लावण अवघ्या चार तासात

Pandurang Patil Technical Bapu Kolhapuri Skill Story
Pandurang Patil Technical Bapu Kolhapuri Skill Story

कोल्हापूर - बापू ऊर्फ पांडुरंग धोंडीराम पाटील टेक्‍निकल माणूस. गावकऱ्यांत बापूंच्या नावाचा बोलबाला आहे. नाना करामती करताना ते कचरायचे नाहीत. शाळेत त्यांचं टक्कूर का चाललं नाही, हे कोडं गावकऱ्यांना सुटलेलं नाही. गणेशोत्सवात मात्र बापूंच्या ईर्ष्येला धग लागायची. पंचक्रोशीत मंडळाचं नाव चमकवण्यासाठी बापू रात्रं-दिवस राबायचे. त्यांनी फिरता कारंजा केल्यावर गावकऱ्यांचे हात त्यांच्या पाठीवर फिरले. वाळू, सिमेंटच्या पाट्या उचलताना त्याला कमीपणा वाटला नाही. बापूंनी गुऱ्हाळघरावरील मजुरांची वजाबाकी करण्याचं यंत्र तयार केले. कमी जागेत गाड्या पार्किंगचा टॉवर बापूंच्या सुपीक डोक्‍यातला कारनामा. त्यांच्या मेंदूत टेक्‍निकल मॉडेल उपजतच बसलं आहे. बापूंच्या हायटेक करामती ‘एक माणूस बारा भानगडी’च्या पठडीतल्या आहेत.

भुयेवाडीतल्या कुमार विद्यामंदिरात बापू पाचवीपर्यंत होते. अभ्यासातलं टक्कूर नाही, असा त्यांचा समज. शेतात घाम गाळणारं पाटील कुटुंबीय. शेतात राबण्यापेक्षा बापूंनी हातात थापी घेतली. गणेशोत्सवात बापूंच्या टेक्‍नॉलॉजीला तोड नव्हती. कलात्मक डेकोरेशनमध्ये त्यांचा बोलबाला होता. शिवलिंगावर पाणी पडणारा देखावा पाहून गावकरी हरकून टूम होते. काहिलीत फिरता कारंजानंही गावकऱ्यांच्या काखा फुगल्या होत्या. गवंडीकामातल्या अनुभवानं बापूंनी गोबरगॅस बांधण्यात कमाल केली. पंचायत समिती सदस्य त्यांच्या कामावर खूश होते. बापूंनी शिंगणापूर, यवलूज पडळ, वडणगे, निगवे दुमालात बांधलेले दोनशेवर गोबरगॅस आजही सुस्थितीत आहेत. 
गवंडीकामातलं दुखणं बापूंना मानवलं नाही. त्यांच्या डोक्‍यात नाना विचारांचा तिढा होता. गुऱ्हाळावर चिपाडे बाजूला काढून ते हाऱ्यात भरण्याचं काम दोन माणसांच. तो भार हलकं करण्यासाठी बापूंनी मेंदू ताणला. २५ हजार रुपये खर्चून चिपाडांचा कन्व्हेअर बनवला. रसानं फटफटलेली चिपाडं बाजूला काढणं, ती डोक्‍यावरून वाहण्यासाठी दोन माणसं लागायची. बापूंनी त्यातल्या एका माणसाला कायमची सुटी दिली.

इलेक्‍ट्रिक ड्रायरचीही निर्मिती 

गुऱ्हाळघरातील काहिलीत त्याची इलेक्‍ट्रिक रहाट भारी चालली. अडाणी बापूंच्या अगाध टेक्‍निकल नॉलेजचा मागमूस गावकऱ्यांना नव्हता. कन्व्हेअरच्या निर्मितीनंतर गावकऱ्यांचे डोळे फिरले. चिपाडे वाळवण्याचा ड्रायर बनविण्याचे शिवधनुष्यही त्यांनी पेललं. पुण्यातल्या पिंपळगावातील गुऱ्हाळघरावर ड्रायर बसवला गेलाय. कोंबडी शीट कन्व्हेअर, सॅंड ड्रायर, खोबरं कटिंग मशिन व खडीसाखरेच्या इलेक्‍ट्रिक ड्रायरच्या निर्मितीतही त्यांचं डोकं भलतंच चाललं. 

बापूंची ऊस लावण आटोपते चार तासात

उसाची एकरात लावण करण्याचं काम दहा माणसांचं. दिवसभर राबल्यानंतर लावण पूर्ण होते. बापूनं केलेल्या ऊसलागवड मशिनद्वारे एकरातील लागणं चार तासांत आटोपते. फक्त तीन माणसांच्या मजुरीचा भार खिशावर पडतो. वीस बाय पंचवीस जागेतला पार्किंगचा टॉवर करण्याचा उद्योग बापूनं केला. भुयेवाडीतल्या रोडवरील हायटेक कृषी उद्योग केंद्रात त्याचं मॉडेल तयार झालंय. महापालिका व पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडं पार्किंगच्या उपयुक्ततेचं निवेदन त्यांन सादर केलं. त्याच्या उत्तराचं पत्र कुठं अडकलंय, हे त्यांना कळालेलं नाही. कारखान्यातल्या अडल्या कामांवर बापूंचा उतारा चालतो. मॉडेलचं डिझाईन करून दिल्यानंतरचा धोका बापूंच्या आता लक्षात आलाय. व्यवहारालं शहाणपणं त्यांनी अंगी उतरवलंय. गुऱ्हाळघराच्या बांधकामात त्यांचा हात आजही थकत नाही. कुटुंबात लक्ष देण्यात त्यांनी कसूर केलेली नाही. बारावीपर्यंत शिकलेला मुलगा- गणेशचा ट्रक आहे. योगेश मोबाईलच्या दुकानात तर नागेश उद्योग केंद्रात यंत्रांच्या जोडाजोडीचं काम करतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com